
ग्रंथालय विभागाची 22 व 23 मे रोजी कार्यशाळा
रत्नागिरी, दि. 21 :- उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई, शासकीय विभागीय ग्रंथालय द्वारा आयोजित राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या अर्थसहाय्याच्या विविध योजनांविषयी मागदर्शनपर दोन दिवसीय विभागस्तरीय कार्यशाळा 22 व 23 मे 2025 रोजी शासकीय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर, खारेघाट रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन 22 मे रोजी गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, प्र. ग्रंथालय संचालक, मुंबई अशोक गाडेकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता चे समिती सदस्य किरण धांडोरे, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता चे सहायक क्षेत्रीय अधिकारी शौविक बिस्वास, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, प्र. सहायक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलिप कोरे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. कार्यशाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार 22 मे रोजी पहिल्या सत्रात दुपारी 12.30 ते 1.30 वाजता राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजना या विषयावर, रा. रा. रॉ. ग्रं. प्र., कोलकाता (पश्चिम विभाग), सहाय्यक क्षेत्रिय अधिकारी शौविक बिस्वास हे मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात दुपारी 3 ते 4 वाजता सोशल मिडीया आणि ग्रंथालयाचे बदलते स्वरुप या विषयावर गोगटे जोगळेकर महाविद्यालाचे ग्रंथपाल किरण धांडोरे मार्गदर्शन करणार आहेत. तिसऱ्या सत्रामध्ये सायंकाळी 4 ते 5 वाजता ग्रंथालय संचालनालयाच्या विविध योजना या विषयावर सहायक ग्रंथालय संचालक, छत्रपती संभाजीनगर सुनिल हुसे मार्गदर्शन करणार आहेत.
शुक्रवार 23 मे रोजी पहिल्या सत्रात सकाळी 10.30 ते 12 वाजता शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय वार्षिक अहवाल, अंकेक्षण अहवाल, कार्यकारिणी बदल अहवालाबाबत मार्गदर्शन शंका-निरसन याबाबत सहायक धर्मादाय आयुक्त श्रीमती एन.एस.सय्यद या मार्गदर्शन करणार आहे. दुसऱ्या सत्रात 12 ते 1.30 वाजता एलजीएमएस प्रणाली व ई ग्रंथालय आज्ञावली या विषयावर सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. विजयकुमार जगताप हे तर तिसऱ्या सत्रात दुपारी 3 ते 4.30 वाजता ग्रंथालयाचे प्रभावी व्यवस्थापनात ग्रंथपाल आणि पदाधिकारी यांची भूमिका या विषयावर मुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी 4.30 ते 5.30 वाजता प्र. उपसंचालक ग्रंथालय संचालनालय शशिकांत काकड यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ होणार आहे.