
गेल्या १८ दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात महामार्ग आणि अंतर्गत मार्गांवर विविध ठिकाणी झालेल्या २२ अपघातांत १२ जणांचा मृत्यू.
मुंबई-गोवा महामार्गावर तसेच रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या अपुऱ्या कामामुळे तसेच वेगात वाहन हाकण्यामुळे अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ लागली आहे.गेल्या १८ दिवसांत जिल्ह्यात महामार्ग आणि अंतर्गत मार्गांवर विविध ठिकाणी २२ अपघात झाले. या अपघातांत १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३१ जण जखमी झाले आहेत.
सध्या उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर कोकणात, गोव्यात सुटीचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. मात्र, या दोन्ही महामार्गांवर अर्धवट राहिलेल्या कामांमुळे वाहनचालकांना डोकेदुखी होत आहे. या मार्गांवरून वाहने नेताना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे अवघड वळणात वाहने कलंडण्याच्या घटना घडत असून, यातून जीवघेणे अपघात घडत आहेत.