मुंबईत २० दिवसांत करोनाचे ९५ रुग्ण; दोघांचा मृत्यू!

मुंबई* हाँगकाँग, सिंगापूर आणि दक्षिण आशियामध्ये करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली असताना मुंबईमध्येही करोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. मुंबईमध्ये मागील २० दिवसांमध्ये करोनाचे ९५ रुग्ण सापडले असून दोघांचा करोनाने मृत्यू झाला आहे. मुंबईत मागील चार महिन्यांत करोनाचे रुग्ण तुरळक सापडत होते. मात्र मे महिन्यांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून गेल्या वीस दिवसांत करोनाचे तब्बल ९५ रुग्ण सापडले आहेत. जानेवारी ते मे या कालावधीत राज्यात करोनाचे १०६ रुग्ण सापडले आहेत. त्यातील मुंबईमध्ये सर्वाधिक १०१ रुग्ण आहेत. या रुग्णांपैकी मे महिन्यात ९५ रुग्ण सापडले आहेत. तर जानेवारी ते एप्रिलदरम्यान फक्त सहा रुग्ण सापडले होते.

जानेवारी व फेब्रुवारीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण, एप्रिलमध्ये चार रुग्ण सापडले होते. मुंबईप्रमाणे मे महिन्यांत राज्यातही करोनाचे रुग्ण सापडले आहेत. राज्यात २० मे रोजी करोनाचे १९ रुग्ण सापडले. त्यात मुंबईत १५, कोल्हापूरमध्ये तीन तर पुण्यात एक रुग्ण सापडला आहे. राज्यामध्ये सापडलेल्या रुग्णांपैकी ३६ रुग्ण बरे झाले आहेत. यातील ५२ रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत. तर १६ रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.मुंबईमध्ये सापडलेल्या करोना रुग्णांपैकी दोघांचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मात्र हे मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाले असून एका रुग्णाला नेफ्रोटिक सिंड्रोम सह हायपोकॅल्सिमिक सीझर होते व दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता, असे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

*घाबरू नका …*राज्यात सध्या करोनाचे तुरळक रुग्ण सापडले आहेत. करोना रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे पुण्यातील बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय आणि एनआयव्ही येथे रुग्णांची जीनोम सीक्वेन्सिंग तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे करोना तपासणी व उपचाराची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील नागरिकांना करण्यात आले आहे.

राज्यामध्ये सध्या करोनासंदर्भात इन्फ्लूएंझा लाईक इलनेस (आयएलआय) आणि सारी (अति तीव्र श्वसन संक्रमण) सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली जाते. या चाचणीमध्ये करोना बाधित आढळणाऱ्या रुग्णांवर नियमित उपचार केले जात आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यामध्ये ६ हजार ६६ इतक्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये १०६ जण करोना बाधित आढळले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button