जिंदाल पॉलीफिल्म्सच्या गोदामाला भीषण आग!

नाशिक-मुंबई* महामार्गावरील मुंढेगाव येथे जिंदाल पॉलीफिल्म्स कारखान्यातील गोदामाला रात्री दोन वाजता भीषण आग लागली. ज्वलनशील साहित्यामुळे अल्पावधीत तिने रौद्रावतार धारण केला. या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू असून तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता अग्निशमन विभागाने वर्तविली आहे.महामार्गावरील इगतपुरी तालुक्यात जिंदाल पॉली फिल्म्स लिमिटेड हा प्रकल्प आहे. बीओपीपी व पीईटीसह वेगवेगळ्या फिल्म्सचे उत्पादन या प्रकल्पात होेते. रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास कारखान्यातील गोदामास आग लागली. ही बाब कामगार व सुरक्षारक्षकांच्या लक्षात आली. त्यांनी लगेचच आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित केली. या घटनेची माहिती मिळताच औद्योगिक विकास महामंडळ, नाशिक महानगरपालिका, इगतपुरी नगरपालिका, महिंद्रा, बॉश आदींचे पाण्याचे बंब घटनास्थळी रवाना झाले. ज्वलनशील फिल्म्समुळे ती सर्वत्र पसरली.

धुराचे उंच लोळ दुरवरून दृष्टीपथास पडत होते. आगीचे स्वरुप पाहून आणखी पाण्याचे बंब मागविण्यात आल्याची माहिती इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारावकर यांनी दिली. गोदामाला लागलेली आग कारखान्यापर्यंत पसरू नये याची काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, तिचे स्वरुप पाहता ती आटोक्यात आणण्यास एक-दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो. असे नाशिक मनपाच्या अग्निशमन दलाचे अधिकारी के. पी. पाटील यांनी सांगितले. आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू असताना मऔविमचा बंब अकस्मात नादुरुस्त झाल्याचे सांगितले जाते. आगीच्या कारणाची स्पष्टता झालेली नाही. या दुर्घटनेत गोदामातील तयार माल भस्मसात होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button