
रत्नागिरी शहरात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते महानगर गॅस कंपनीने पावसा आधी पूर्ववत करावेत पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश
रत्नागिरी- गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते महानगर गॅस कंपनीने निकषानुसार पूर्ववत करावेत. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी याबाबतचे सर्वेक्षण 2 दिवसात करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
येथील शासकीय विश्रामगृहात याबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्याधिकारी वैभव गारवे, महानगर गॅस कंपनीचे आशिष प्रसाद, राजन शेट्ये, बिपीन बंदरकर, निमेष नायर, स्मितल पावसकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, ज्या ठिकाणी महानगर गॅस कंपनीने पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदले आहेत, त्याठिकाणी निकषानुसार त्याची दुरुस्ती करावी. ती कंपनीची जबाबदारी आहे. मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत शहरातील कामाचे दोन दिवसात सर्वेक्षण करावे. पावसाच्या आधी महानगर कंपनीने खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करावे. खोदलेली चर बुजवून पूर्ववत करावी.
सीएनजी वितरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी
जिल्ह्यातील सर्व सीएनजी पंपांवर लागलेल्या रांगाबाबतही पालकमंत्री डॉ. सामंत यांनी महानगर कंपनीला विचारणा करुन, सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालून तातडीने बैठक घ्यावी. सीएनजीच्या या पुरवठ्याबाबत समांतर वितरण करण्याबाबतही डॉ. सामंत यांनी निर्देश दिले.
स्थानिक बस वाहतुकीचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणेच सुरु ठेवा. नोकरदारांची कोणतीही गैरसोय होणार नाही, हे प्राधान्यांने पहा,असे निर्देशही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी दिले.