
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं निधन
जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आंतररष्ट्रीय स्तरावर त्यांची ख्याती होती. खगोलशास्त्रातील ध्रुवतारा निखळल्याची भावना अनेकांच्या मनात आत्ता आहे. डॉ जयंत नारळीकर रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहण्यासाठी देखील लोकप्रिय होते. केंब्रिज या विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले. आधी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा उचलला. २०२१ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आज पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
जयंत नारळीकर यांनी सोप्या भाषेत विज्ञान समजावून सांगणारी अनेक पुस्तकं लिहिली. आकाशाशी जडले नाते या पुस्तकाला अमाप प्रसिद्धी मिळाली. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. डॉ. जयंत नारळीकर यांच्या वैज्ञानिक कार्याची दखल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून, त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९६५ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण आणि २००४ मध्ये पद्मविभूषण या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवले. याशिवाय, डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम. पी. बिर्ला सन्मान, तसेच फ्रेंच अॅस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सन पुरस्कार हे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय सन्मानही त्यांना प्राप्त झाले.डॉ. नारळीकर हे लंडनच्या रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सहकारी सदस्य आहेत. तसेच, इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमी आणि थर्ड वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थांचेही ते अधिछात्र (फेलो) आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीने त्यांना इंदिरा गांधी पारितोषिकाने सन्मानित केले आहे.विज्ञानविषयक साहित्यिक लेखन आणि विज्ञानप्रसारात दिलेल्या योगदानासाठी, युनेस्कोने १९९६ मध्ये त्यांना ‘कलिंग पारितोषिक’ प्रदान केले. त्यांच्या लेखनातून विज्ञान सामान्य माणसाच्या अधिक जवळ नेण्याचे मोठे कार्य घडले आहे.