
लांजा विकास आराखड्याविरोधात तब्बल १,५०० हरकती, पुढील सुनावणीकडे नागरिकांचे लक्ष.
लांजा नगर पंचायत प्रशासनाकडून शहराचा प्रारुप विकास आराखडा (डीपी प्लॅन) जाहीर करण्यात आल्यानंतर या आराखड्याविरोधात हरकती घेण्याची मुदत १५ मे पर्यंत होती. ती मुदत संपुष्टात आली असून तब्बल १,५०० हरकती अर्ज लांजा नगर पंचायतीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. दरम्यान यासंदर्भातील पुढील सुनावणीकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.शहराचा प्रारुप विकास आराखडा जाहीर करण्यात आल्यानंतर लांजा-कुवे परिसरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. विकास आराखड्यासंदर्भात लांजात संमिश्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत होत्या. एकीकडे विकास आराखड्याला जोरदार विरोध होत असताना दुसरीकडून विकास आराखड्याचे समर्थनही होताना पहायला मिळाले होते.लांजा शहराचा प्रारुप विकास आराखडा २७ मार्च रोजी जाहीर करण्यात आला. या आराखड्याबाबत हरकती घेण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल देण्यात आली होती. दरम्यान २६ एप्रिल रोजी आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विकास आराखड्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक लावण्यात आली होती. नागरिकांच्या रोषामुळे ही बैठक वादळी ठरली होती. दरम्यान, हरकती घेण्यासाठी असलेला २८ एप्रिलपर्यंतचा कालावधी वाढवून १५ मे पर्यंत करून देण्यात आला होता. तो कालावधी संपुष्टात आला असून जवळपास १,५०० हरकती अर्ज नागरिकांच्यावतीने लांजा नगर पंचायतीच्या कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत. लांजावासियांचे लक्ष आता पुढील सुनावणीकडे लागले असून येत्या काही दिवसांत याबाबत त्यांची भूमिका काय असेल, हे दिसून येईल.www.konkantoday.com