
भोस्ते घाटात ट्रकमधून ७० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरणाऱ्या चोरट्यांना पोलीस कोठडी
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात ट्रकमधून ७० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरणाऱ्या अटकेतील ‘त्या’ दोघांनी बोरज येथे जून महिन्यात झालेल्या १ लाख ४० हजार रूपये किंमतीच्या जिओ मोबाईल टॉवरचे साहित्य चोरल्याची कबुली दिली आहे. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोघांनाही तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आणखी कोणत्या चोरीत दोघांचा सहभाग आहे का, याचा पडताळा पोलिसांकडून करण्यात येत आहे.भोस्ते घाटात ट्रकचालक झोपला असल्याची संधी साधत ट्रकमधील दोन बॅटऱ्या, स्टेफनी, टायर असा ७० हजार रूपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोलीस शिपाई प्रकाश पवार व पथकाने शंकर सुरेश बुरटे (३८ रा. चिपळूण- खंड-कांगणेवाडी), इब्राहिम सलीम पटाईत (२२ रा. गोवळकोटरोड-चिपळूण) यांच्या काही तासांतच मुसक्या आवळत चोरीचा छडा लावला होता. पोलिसांनी दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली असता आणखी एका चोरीचीही कबुली दिली.२१ जून २०२४ रोजी बोरज येथील जिओ मोबाईल टॉवरचे १ लाख ४० हजार रूपये किंमतीचे साहित्य चोरीस गेल्याची तक्रार नीलेश बबन धोत्रे यांनी येथील पोलीस स्थानकात दिली होती.