सिंधुरत्न समृध्द योजना उमेदच्या हाऊस बोटीचे जांभारी बंदरात लोकार्पण पर्यटकांना नम्रतापूर्वक वागणूक द्यावी भाट्ये पुल येथे हाऊसबोट टर्मिनल ; महिलांसाठी आणखी 3 हाऊस बोटी – पालकमंत्री डॉ. उदय सामंत.

रत्नागिरी, दि. १८ : कोकणात विशेषत: जिल्ह्यात जांभारीत दुसऱ्या हाऊस बोटीचे लोकार्पण होत आहे. पर्यटकांना केरळनंतर आता जांभारीत यावे लागेल. महिला भगिनिंनी पर्यटकांना नम्रतापूर्वक वागणूक दिली पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. केरळपेक्षा चांगल्या पध्दतीचे भाट्ये पुल येथे टर्मिनल तयार करु. पुढच्या दोन वर्षात महिलांच्या हाती 10 हाऊस बोटी असतील. त्या फक्त महिला चालवतील. भाट्ये येथे 3 हाऊस बोटी महिलांच्या हातात दिल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.

जिल्हा परिषद रत्नागिरी सिंधुरत्न समृध्द योजना 2023-24 पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी उमेद अंतर्गत महिला प्रभाग संघांना देण्यात येणाऱ्या हाऊस बोटचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते जांभारी बंदरात आज झाले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, डीआरडीएचे प्रकल्प संचालक विजय जाधव, गटविकास अधिकारी चेतन शेळके, बाबू म्हाप, सरपंच आदेश पावरी आदी उपस्थित होते.

फित कापून हाऊस बोटीचे लोकार्पण केल्यानंतर पालकमंत्री यांनी बोटीची पाहणी केली. त्यानंतर मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे, त्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी सोबत मी असेन, असे अभिवचन मी दिले होते. त्याची वचनपूर्ती करणारा हा आजचा सोहळा आहे. 1 कोटीची बोट महिला बचत गट चालविणार आहे. भाट्ये येथे 3 बोटी देणार असून, त्यातून महिलांना रोजगार दिला जाईल. महिला भगिनींकडून हाऊस बोट चालवणारा देशातला हा आदर्शवत प्रकल्प आहे. महिला सक्षमपणे काम करत आहेत, त्याचा अभिमान सर्वांना असला पाहिजे.

ग्रामीण भागातील महिलांनी बचतगटाचे काम सक्षमपणे करुन आपले कर्तृत्त्व सिध्द केले आहे. रत्नागिरी येथे नव्याने झालेल्या बसस्थानकामध्ये बचतगटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉल उभारला जाईल. देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, युध्दजन्य परिस्थितीची माहिती 2 महिला अधिकारी जगाला देत होत्या. त्यातही सोफीया कुरेशी सारखी महिला नेतृत्त्व करते, हा आपला सर्वांचा अभिमान आहे. देशातला सर्वात चांगला चहा, त्याच्या विक्रीचे स्टॉल रत्नागिरीत महिलांना दिले जातील, असेही पालकमंत्री म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यकमास महिला वर्गांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button