
19 मे रोजी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश.
रत्नागिरी, दि. 17 : आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिनस्त असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या दोन्ही संस्थांची गट ड (वर्ग- 4) सरळसेवा भरती प्रक्रिया सुरु ओ. उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) 19 मे 2025 रोजी दोन सत्रांमध्ये आय.बी.पी.एस या कंपनीकडून घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे प्रथम सत्र सकाळी 8 वाजता सुरु होणार असून दूस-या सत्रातील परीक्षा दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. सदर परीक्षा जिल्ह्यामधील राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी, आंबव, देवरुख ता. संगमेश्वर या केंद्रावर होणार आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारान्वये परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 19 मे रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीत अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मीटर परिसरातील एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण इ. माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील. हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी/कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी/पोलीस अधिकारी यांच्याबाबत त्यांचे परीक्षा संबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. मात्र, त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील.
या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.