मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक आपत्ती काळात प्रशासनाने सतर्कतेने काम करावे- डॉ. पालकमंत्री उदय सामंत.

*रत्नागिरी, – जिल्ह्यात यापूर्वी आलेला पूर, वादळाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे व समन्वयाने काम करावे. कोणतीही दूर्घटना होवू नये याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर या तालुक्यांमध्ये पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. पूर निवारणासाठी संबंधित विभागांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात. नद्यांमधील गाळ तात्काळ काढून घ्यावा. हा गाळ नदीकिनारी न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी विभागस्तरावर बैठक आयोजित करुन आपत्ती काळात करावयाच्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा. दरड कोसळण्याची संभावना असणाऱ्या दरडप्रवण क्षेत्रात दरड कोसळू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात. घाटामध्ये दरड कोसळून अपघात होवू नये, याची दक्षता घ्यावी. जिल्हा परिषदेने शाळांची दुरुस्ती करावी.

आरोग्य विभागाने औषध साठा, रुग्णवाहिका, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी याबाबत आढावा घेवून पावसाळ्यातील साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी यंत्रणा तयार करावी.

पावसाळ्यात होर्डिंग्जमुळे अपघात होवू नयेत. यासाठी जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ काढून टाकावेत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी नगरपालिका प्रशासन विभागाला दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी या होर्डिंग्ज बाबत सर्व्हेक्षण करुन अहवाल सादर करावा, असेही ते म्हणाले. महावितरणने पावसाळ्याच्या दृष्टीने दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करावीत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव कार्यासाठी मदत करणाऱ्या संघटनांचे आपत्ती व्यवस्थापन किट ठेवण्यासाठी प्रत्येक नगरपरिषदेने जागा उपलब्ध करुन द्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button