
रत्नागिरीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या त्या’ बांगला देशी महिलेला कारावासाची शिक्षा.
व्हिसाचा कालावधी संपूनही शहरातील साळवी स्टॉप येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य तसेच बनावट कागदपत्रे तयार करणार्या बांगला देशी महिलेला न्यायालयाने बुधवारी सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.या महिलेला 17 जानेवारी 2025 रोजी दहशतवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती.सलमा खातून बिलाल मुल्ला ऊर्फ सलमा राहिल भोंबल (30, रा. सफा टॉवर्स बिल्डिंग ए विंगमधील फ्लॅट नंबर ए 9, साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आहे. सलमा 16 डिसेंबर 2016 रोजी 90 दिवसांचा व्हिसा घेऊन भारतात आली होती. यावेळी तिचे वास्तव्य शृंगारतळी गुहागर या ठिकाणी होते. या नंतर सलमाने राहिल भोंबल याच्याशी विवाह केला. तसेच व्हिसाची मुदत संपली असतानाही तिने 2017 ते 2025 या कालावधीत अवैधरीत्या भारतात वास्तव्य केले.या काळात सलमा हिने आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला आदी बनावट कागदपत्रे तयार करून भारतात वास्तव्य केले. तिच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 1950 चा नियम 3(ए),6(ए) विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14 (अ) व कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला न्यायालयात सुरू होता. बुधवारी मुख्य न्याय दंडाधिकारी गोसावी यांनी आरोपी महिलेला 6 महिने साधा कारावास व पाचशे रुपये दंड तो न भरल्यास 1 दिवस साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली.




