
बाथरूमची कडी का बदलली? बदलताना आम्हाला विचारले का?’ या शुल्लक कारणावरून दांपत्याला बेदम मारहाण.
खेड तालुक्यातील आंबडस बौद्धवाडी येथे एका घरातील बाथरूमची कडी बदलल्याच्या रागातून चार जणांनी एका ४९ वर्षीय प्रौढ व्यक्ती आणि त्यांच्या ४५ वर्षीय पत्नीला बेदम मारहाण केली. तसेच महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ११ मे रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता घडली.या संदर्भात सीमा उमेश चंपलोन (रा. वरळी, मुंबई) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी रमेश काशीराम हळदे, विजय काशीराम हळदे, रंजन रमेश हळदे आणि प्रफुल्ल महेंद्र साळुंखे (सर्व रा. आंबडस बौद्धवाडी) या चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास उमेश चंपलोन यांनी त्यांच्या वैयक्तिक खोलीतील बाथरूमची कडी बदलली होती. याचा जाब विचारण्यासाठी रमेश हळदे यांनी ‘बाथरूमची कडी का बदलली? बदलताना आम्हाला विचारले का?’ असे म्हणून वाद घातला. यावर उमेश चंपलोन यांनी ‘वैयक्तिक बाथरूम असल्याने विचारण्याचा विषय येत नाही आणि फक्त कडी बदलली आहे’ असे उत्तर दिले. यामुळे संतप्त झालेल्या रमेश हळदे याने उमेश चंपलोन यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विजय काशीराम हळदे आणि प्रफुल्ल महेंद्र साळुंखे यांनीही त्यांना मारहाण केली. इतकेच नव्हे, तर या आरोपींनी घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या आणि घरातील साहित्याची तोडफोड करून ते विस्कटून टाकले. तसेच, त्यांनी उमेश चंपलोन यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे.दरम्यान, सीमा चंपलोन या आपल्या पतीला सोडवण्यासाठी पुढे आल्या असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण केली आणि त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीत उमेश चंपलोन गंभीर जखमी झाले असून त्यांचा हात फॅक्चर झाला आहे.