
लांजातील तरूणाने राबविला आगळावेगळा उपक्रम, विवाह सोहळ्यात रिटर्न गिफ्ट म्हणून भारताचे संविधान पुस्तक.
लग्न हा मानवी जीवनातील प्रसंग, काही वैभवशाली लग्नांची वर्णने आपण ऐकतो आणि वाचतोही. मात्र लांजात रविवारी संपन्न झालेल्या एका विवाहसोहळ्यातून एका जागरूकतेची तळमळ देखील दिसून आली. हल्लीच्या काळात लग्नप्रसंगात रिटर्न गिफ्ट देण्याची एक प्रथाही रूढ झाली आहे. मात्र राजापूर-लांजातील एका सेवाभावी इलेक्ट्रीकल व्यावसायिक असलेल्या उमद्या मनाच्या तरूणाने आपल्या लग्नात चक्क प्रत्येकाला भारतीय संविधानाचे भलेमोठे पुस्तक रिटर्न गिफ्ट म्हणून आदराने देत आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. या अनोख्या गिफ्टने अनेकजण भारावून गेल्याचे पहायला मिळाले. राजापूरच नव्हे तर लांजा तालुक्यात महावितरणच्या माध्यमातून इलेक्ट्रीकल स्तरावर कार्यरत असलेल्या रूपेश कांबळे या तरूणाचा विवाह रविवारी लांजातील आग्रे हॉलमध्ये प्रतिक्षा जाधव यांच्यासोबत अत्यंत थाटामाटात संपन्न झाला. आमदार किरण सामंत हे मुंबईत असल्याने त्यांची सुकन्या कु. अपूर्वा सामंत यांनी खास हजेरी लावली होती. याशिवाय विविध क्षेत्रातील दिग्गज या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.www.konkantoday.com