
मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 प्रमाणे वाहतूक नियमन.
रत्नागिरी, दि. 13 : खेड-दापोली राज्य मार्ग क्र. 162 चे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्याने काम चालू आहे. विशेषतः दापोली तालुक्यातील वाकवली या ठिकाणी रस्त्याचे नव्याने काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे.
याठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. सद्यस्थितीत एकेरी वाहतूक चालू आहे. अवजड वाहने आल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होवून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
सध्या दापोलीकडे मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या गाड्या येत जात असल्याने त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करून वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मोटार वाहन अधिनयम 1988 चे कलम 115 अन्वये खेड-दापोली राज्य मार्ग क्र. 162 या मार्गाचे नव्याने काम चालू असल्याने 10 जून 2025 पर्यंत अवजड वाहनांची वाहतूक खेड दस्तुरी मार्गे पालगड सोंडेघर मार्गे दापोलीकडे व दापोलीकडून खेडकडे जाणारी अवजड वाहने दापोली-सोंडेघर-पालगड-दस्तूरी मार्गे खेडकडे वळविण्यात यावी.
वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करावे. वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी याकरीता मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे.