
रत्नागिरीच्या नूतन बसस्थानकाचे ११ रोजी लोकार्पण
राज्य परिवहन रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे (ग्रामीण व शहरी) काम पूर्ण झाले आहे. या वास्तूचा लोकार्पण सोहोळा दि. ११ मे रोजी सायंकाळी ५ वाजता ना. प्रताप सरनाईक मंत्री, परिवहन तथा अध्यक्ष म.रा.मा.प. महामंडळ महाराष्ट्र राज्य व ना. उदय सामंत मंत्री, उद्योग व मराठी भाषा तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामध्ये झालेल्या समंजस करारानुसार रत्नागिरी जिल्हातील रा. प. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक नूतनीकरण व वाहनतळ कॉंक्रिटीकरण करण्याचे काम महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ रत्नागिरी यांच्याकडून हाती घेण्यात आले होते.
रा. प. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक नूतनीकरण व वाहनतळ कॉंक्रिटीकरण करणाच्या कामासाठी अंदाजे रु.१७.५० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार या कामास फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. या बस स्थानकात विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रशस्त बसस्थानक इमारत, ग्रामीण बसेसकरिता १४ फलाट व शहरी बसेसकरिता ६ फलाटांची व्यवस्था उपलब्ध केलेली आहे. रा.प. चालक व वाहक (महिला व पुरुष) यांचे करीता सर्व सोयींयुक्त वातानुकूलित विश्रांतीगृह. सर्व सोयींयुक्त वातानुकूलित हिरकणी कक्ष, स्थानक प्रमुख कार्यालय, रा.प.चे इतर कार्यालये, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र पोलीस नियंत्रण कक्ष, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष, विद्यार्थी पास व आरक्षण कक्ष, पार्सल कक्ष, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र प्रशस्त उपहारगृह, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह प्रशस्त प्रवाशी प्रतिक्षालय, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र महिला व पुरुष प्रवाशी प्रसाधनगृह, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, ग्रामीणसाठी ६ वाणिज्य आस्थापना गाळे व शहरीसाठी १८ वाणिज्य गाळे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संपूर्ण बसस्थानक वाहनतळास कॉंक्रिटीकरण व ड्रेनेज व्यवस्था करण्यात आलेली आहे.www.konkantoday.com