
आमदार भास्करराव जाधव सभापतींवर नाराज.तुम्ही विरोधी पक्षनेतेपदाचा विचार न केल्यास आम्हाला सरन्यायाधीशांसमोर बोलावं लागेल
भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा जो विषय मांडला आहे, तो माझ्या विचाराधीन आहे. कायदेशीर तरतुदींचा आणि प्रथा परंपरेचा विचार करून याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेईन, असे विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी म्हणताच आमदार भास्करराव जाधव भडकले.तुम्ही विरोधी पक्षनेतेपदाचा विचार न केल्यास आमी सरन्यायाधीशांसमोर बोलावं लागेल, कसा लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, याबाबत सांगावे लागेल, असा इशाराच दिला. याच सभागृहात पाच ते सहा सदस्यांनाही विरोधी पक्षनेतेपद देण्याची परंपरा आहे. दिल्लीत आपचे सरकार असताना अवघे तीन सदस्य असलेल्या भाजपला आप सरकारने विरोधी पक्षनेतेपद दिलेले आहे, असा दाखलाही दिला.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा उपस्थित केला
आम्हाला विधीमंडळाकडून कायदेशीरदृष्ट्या पत्रही मिळाले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी १० टक्के आमदारांची अट कुठेही नाही. लोकसभेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांच्या काही निर्णयाचा संदर्भ दिला जात होता, त्या सर्वांवर चर्चा झालेली आहे. विधीमंडळाकडून मला पत्रही आलेले आहे, असे भास्कर जाधव बोलत होते.
त्याच वेळी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत ‘असे चालणार नाही’, असे सुनावले. त्यावर भास्कर जाधवही चिडले आणि ‘का नाही चालणार,’ असे म्हणत अध्यक्षांना भिडले. मी तुम्हाला विनंती केली आहे. त्यात वावगं काय आहे, असे जाधव सांगत होते, तर अध्यक्ष, ‘असं चालणार नाही, मी तुमचं ऐकलं, आता तुम्ही माझं ऐकणार की नाही, असे म्हणत होते.गदारोळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भास्करराव, मी तुम्हाला विनंती करतो. हा मुद्दा मांडायला काही हरकत नाही. बोलण्याची परवानगी देण्याचे विधानसभा अध्यक्षांच्या हातात आहे. आपण प्रश्नोत्तर, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अभिनंदनाचा ठराव करू आणि त्यानंतर भास्कररावांना म्हणणं मांडण्याची परवानगी द्यावी आणि त्यावर चर्चा करून योग्य तो निर्णय करावा, अशी विनंती अध्यक्षांना करतो, असे सांगितले.
मी भास्कर जाधवांना बोलायची परवानगी देतो. पण एक गोष्ट रेकॉर्डवर आणणं आवश्यक आहे. विरोधी पक्षनेत्यांना रिकगनाईज करण्याचे संपूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांचे आहेत. त्यासंदर्भात सभागृहात चर्चा करणे कितपत योग्य आहे, ते तुम्ही ठरवा. विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्यावर तुम्ही मला दालनात येऊन भेटलात. तुम्ही माझ्याशी चर्चा केलेली आहे. योग्य निर्णय योग्य वेळी घेणार असे मी सांगितलेही आहे. त्यानंतर सभागृहात त्यावर चर्चा करणे योग्य आहे, असे मला वाटत नाही, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले.विधानसभा अध्यक्षांच्या स्पष्टीकरणानंतरही भास्कर जाधव हे बोलायला उभे राहिले. ते म्हणाले, मी तुम्हाला विनंती करण्यासाठी उभा आहे, वाद घालायला नाही. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटलो. सनदशीर मार्गाने हा विरोधी पक्षनेतेपदाचा विषय सुटावा, अशी आमची मागणी आहे. विरोधी पक्षनेते नियुक्तीचा विषय आपण एका मिनिटांत सांगितला तर आम्ही एका सेकंदात बसतो. नाही तर सरन्यायधीशांसमोर लोकशाहीचा गळा कसा घोटला जातो, हे सांगावे लागेल. हे आम्हाला बाहेर जाऊन बोलावं लागणार आहे.




