
पाचल (राजापूर) येथे गोवंश वाहतूक करणारे दोन इसम ताब्यात
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
रत्नागिरी : राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचल ते जवळेथर जाणाऱ्या रस्त्यावर गगनबावडा घाट मार्गे अवैध व बेकायदेशीर पणे गोवंश जनावरांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास केला असता पाचल येथे वाहनांच्या तपासणी नाक्यावर एका वाहनात हौद्यामध्ये एकूण १३ गोवंश जातीची जनावरे यांना दोरीच्या सहाय्याने दाटी वाटीने जवळ-जवळ बांधलेली आढळली. याप्रकरणी
सलमान मुस्ताक बलबले (वय ३५, रा. बलबले मोहल्ला, ता. राजापूर) व संजय दत्तराम पाटणकर (वय ४८, रा. कुंभवडे, रामणवाडी ता. राजापूर जि. रत्नागिरी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या १३ गोवंश गुरांची सुटका करण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये गोवंश वाहतूक व कत्तल संदर्भातील गुन्हयांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने २२ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक लांजा उपविभागामध्ये गस्त घालत असताना राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचल ते जवळेथर जाणाऱ्या रोडने गगनबावडा घाट मार्गे अवैध व बेकायदेशीर पणे गोवंश जनावरांची वाहतूक होणार होणार असल्याची विश्वसनीय बातमी पोलिसांना मिळाली. हे पथक पाचल येथे वाहनांची तपासणी करण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी थांबले व वाहनांची तपासणी करीत असताना एक टाटा कंपनीचे वाहन (MH-08-AP-0254) थांबवून त्याची तपासणी केली असता या वाहनाच्या हौद्यामध्ये एकूण १३ गोवंश जातीची जनावरे यांना दोरीच्या सहाय्याने दाटी वाटीने जवळ-जवळ बांधलेली आढळली.
या गाडीतील गोवंश जनावरांना गाडीतील हौद्यात पाणी न देता गाडीमध्ये वेदना किंवा यातना होतील अशा रीतीने दोरीने बांधून तसेच त्यांच्या खाद्याची कोणतीही व्यवस्था न करता, त्यांच्या कत्तलींसाठी वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. या गाडीच्या चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे गोवंश जनावरे वाहतुकीचा परवाना अगर पशु-वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी केली नसल्याचे त्याने सांगितले. दोन पंचांसमक्ष त्याचे नाव-गाव विचारले असता चालकाने आपले नाव सलमान मुस्ताक बलबले व संजय दत्तराम पाटणकर असे सांगितले. तसेच या दोन्ही इसमांकडे गोवंश जनावरे कोठून आणली याबाबत विचारणा केली असता त्यांनी ही गोवंश जनावरे तळगाव कोडे येथे राहणारा काजी मोहम्मद उर्फ पांड्या यांच्याकडून आणल्याचे सांगितले.
या वाहनात असलेली एकूण १३ गौवंश जनावरे कत्तल करण्यासाठी गैर कायदा, बिगर परवाना अवैधरित्या वाहतूक करून घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. म्हणून नमूद तीनही इसमांवर राजापूर पोलीस ठाण्यात प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1),11 (1) (h), 11(1)d, 11(3)८, सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 (अ), 5 (ब) व 9 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119 सह मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 66/192, प्राण्यांची वाहतूक नियम 1978 चे कलम 47, 48, 49, 50, 51, 54, 56 भा. न्या. सं 2023 चे कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून या गुन्ह्यामध्ये एकूण २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच एक वाहन मिळून १२ लाख ५ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तसेच १३ गोवंश गुटांची सुटका करण्यात आलेली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे आणि स.पो.फौ. सुभाष भागणे, पो.हवा नितीन डोमणे, पो.हवा पालकर, पो.हवा कदम व पो.हवा प्रवीण खावे यांनी केली.




