
भूमी अभिलेखकडून प्रत्यय व इप्सित प्रणालीद्वारे आॕनलाईन सुविधा http://pratyay.mahabhumi.gov.in चा वापर करावा.
रत्नागिरी, दि.9 :- भूमी अभिलेख कार्यालयाकडून प्रत्यय व इप्सित प्रणाली द्वारे जनतेला आँनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. प्रत्यय प्रणाली या पोर्टलवरुन राज्यातील विविध विभागांमधील अर्ध-न्यायिक न्यायालयांमधील खटल्यांच्या स्थितीचे निरीक्षण करता येवू शकते. तसेच प्रकरणांची स्थिती, प्रकरणांची नोंदणी, प्रकरणांचा तपशिल, याचिकाकर्त्यांचे तपशिल, मागील न्यायालयीन संदर्भासह प्रकरणांची नोदणी कार्यवाही, प्रकरणांची दैनंदिन सुनावणी व कार्यवाही, प्रकरणांचे अंतिम निर्णय पाहण्याची सुविधा प्रत्यय पोर्टलवर उपलब्ध आहे.
प्रत्यय वेबसाइट इंग्रजी आणि मराठी भाषेत उपलब्ध असून अँड्रॉइड आणि आयओएस अॅप्ससह मोबाइल, टॅब, लॅपटॉप आणि संगणकासह कोणत्याही डिव्हाइसवर काम करण्यासाठी तयार केलेली आहे. प्रत्यय प्रणालीकरिता http://pratyay.mahabhumi.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. ईप्सित आज्ञावलीचा वापर करून मिळकत पत्रिकेवरील वारसा हक्काने, मृत्यूपत्राने, खरेदीखताने इत्यादी अन्वये फेरफारसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. ईप्सित प्रणालीकरीता http://epsit.mahabhumi.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. प्रत्यय व ईप्सित या ऑनलाईन सुविधेचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख एस.एस.इगळी यांनी केले आहे.