
ई पीक पाहणी शेतकरी स्तरावरील नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी, दि. 23 ):- खरीप हंगाम 2025 साठी पीकांची नोंद “ई पीक पाहणी डीसीएस मोबाईल एप्लीकेशन” मध्ये शेतकरी स्तरावरील ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी कळविले आहे.
यापूर्वी हा कालावधी 1 ऑगस्ट ते 15सप्टेंबर 2025 पर्यंत होता. राज्यात काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी, दुबार पेरणी या कारणांमुळे शेतकरी पिकाची नोंद करण्यापासून वंचित राहू नये याकरिता शासनाकडून शेतकरी स्तरावरील पीक नोंदणीसाठी 20 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तद्नंतरही ई पीक पाहणीची टक्केवारी कमी असल्याने शेतकरी स्तरावरील पीक नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
ई-पीक पाहणी हा शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची माहिती स्वतः डिजीटल पद्धतीने नोंद करता येते. या प्रणालीमुळे पिकांची अचूक माहिती सरकारकडे जमा होते, ज्यामुळे शेतीविषयक योजना, पीक विमा योजना आणि इतर शासकीय अनुदानासाठी याचा उपयोग होतो.
खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकरी स्तरावरून आजअखेर 10 हजार 983 खातेदारांनी एकूण 17 हजार 387.10 हे. क्षेत्राची ई पीक पाहणी अंतर्गत नोंद केली आहे. पीक विमा योजनेत सहभाग, पीक कर्ज, नुकसान भरपाई, शासकीय भात खरेदी-विक्री व शासनाच्या इतर योजनेकरिता ई पीक पाहणी करणे बंधनकारक असल्याने उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी डीसीएस मोबाईल एप्लीकेशन मध्ये ऑनलाईन पद्धतीने खरीप हंगामातील पिके तसेच फळपिकांची नोंद करावी.




