
रत्नागिरी जिल्ह्यात मनसेचा राजकीय पटलावर झेंडा फडकावण्याचा निर्धार.
महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक आणि रोखठोक भूमिका घेणारा पक्ष म्हणून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे पाहिले जाते. दुर्दैवाने, रत्नागिरी जिल्ह्यात या पक्षाला तेवढी उभारी घेता आली नाही. आता पात्र पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा घरोघरी पोहोचवून आगामी काळात जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मनसेचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला आहे. याचपार्श्वभूमीवर दि. १८ मे रोजी शहरातील हॉटेल अतिथीच्या सभागृहात सकाळी ११ वा. भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्षातील बड्या नेत्यांच्या उपस्थितीत होणार्या या मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशही होणार असल्याने येत्या काळात जिल्ह्यात मनसेचे ’इंजिन’ सुस्साट धावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या उत्तर रत्नागिरी विभागात पक्ष बांधणी जोरदार सुरू आहे. जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार पाच तालुक्यात कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच प्रत्यय दि. १८ मे रोजी होणार्या मेळाव्यात दिसून येणार आहे. अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, प्रकाश महाजन, अविनाश जाधव, अनिल खानविलकर, वैभव खेडेकर यांसारखे पक्षातील वरिष्ठ नेते या मेळाव्याला उपस्थित राहून मनसैनिकांना उर्जितावस्था देणार आहेत.www.konkantoday.com




