
येत्या रविवारी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याहस्ते होणार ‘लो.टि.स्मा.’च्या रामभाऊ साठे वस्तूसंग्रहालयाचे उद्घाटन.
चिपळूण :: येथील शतकोत्तर हिरक महोत्सवी परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या रामभाऊ साठे वस्तूसंग्रहालयाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणाऱ्या या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, चिपळूण नगरपरिषदेचे प्रशासक विशाल भोसले आणि पुरातनवस्तू संग्राहक डॉ. श्रीधर ठाकूर उपस्थित राहणार आहेत.
चार वर्षापूर्वीच्या भयावह महापूरात झालेल्या अपरिमित नुकसानीतून अत्यंत परिश्रमपूर्वक सावरलेले वस्तूसंग्रहालय शासनाच्या सहकार्याने वाचनालयाच्या अप्पासाहेब साठे सभागृहाच्या दुसऱ्या मजल्यावर नव्याने उभे राहिले आहे. या ठिकाणी मागील पाचशे वर्षांपासूनच्या अप्रतिम शिल्पकलेच्या व अलौकिक धातूशास्त्राच्या मूर्ती व ऐतिहासिक व अत्यंत दुर्मिळ शस्त्र ते अश्मयुगीन हत्यारांपर्यंतचा खजिना स्थानापन्न झाला आहे. संग्रहालयात प्रवेश करताक्षणी देवी श्रीविंध्यवासिनीचे दर्शन होत आहे. १८७७ ते १९०७ असे तब्बल ३० वर्ष चिपळूणचे पहिले नगराध्यक्ष राहिलेल्या रंगनाथ बापूजी पत्की यांच्या नित्य पूजेतील खंडोबाची मूर्ती, हरणाच्या शिंगाचे ‘माडू’ हत्यार, शत्रूच्या शरीरात आणि विशेषतः पोटात मारून त्याची आतडी ओढणारे अत्यंत दर्शनदुर्लक्ष ‘गुर्ज’ हत्यार आदी विविध काळातील शस्त्रे, कोकणातील नारळाच्या झापांचे घर, शिमगा-संकासूर, ग्रामदेवतांची पालखी आदी ऐवज पाहाता येणार आहे. चिपळूणचे ‘लोटिस्मा’ वाचनालय पुस्तकांची केवळ देवाणघेवाण पुरते मर्यादित न राहाता मुक्त वाचनालय, कलादालन, ऐतिहासिक दस्तावेजाचं लोकजागरण यासह स्वातंत्र्यसमरातील क्रांतीकारक व त्यांचे कार्य, स्पर्धा परिक्षार्थीसाठी अरविंद जाधव अपरान्त संशोधन संस्थेसह कार्यरत आहे.
वाचनालयाने बालकुमार ते कामगार आणि कोकण ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापर्यंत वैविध्यपूर्ण दहाहून अधिक संमेलने दिमाखदार व संस्मरणीय पद्धतीने यशस्वी केली आहेत. लोटिस्माचे हे संग्रहालय २०२१ साली चिपळूणला आलेल्या महापुरात उद्ध्वस्त झाले होते. संचालक मंडळाने पुरामुळे निर्माण झालेल्या चिखलातून एकएक वस्तू गोळा करून ठेवली होती. पालकमंत्री ना. सामंत यांनी उध्वस्त झालेल्या संग्रहालयाला भेट देऊन हे संग्रहालय पुन्हा उभे करण्यासाठी खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून दिला होता. संग्रहालयाच्या या उद्घाटन समारंभाला सर्व नागरिक बंधू-भगिनीनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ‘लोटिस्मा’च्या संचालक मंडळाने केले आहे.