
“बुद्धगया आमच्या हक्काची”… रत्नागिरीत जनआक्रोश मोर्चाबोधगया टेंपल ॲक्ट रद्द करण्याची जोरदार मागणी
. रत्नागिरी /. बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्मीयांशिवाय इतरांचा हस्तक्षेप असलेला बोधगया टेंपल ॲक्ट १९४९ रद्द करावा, या मागणीसाठी रत्नागिरीत बुधवारी (दिनांक ७ जानेवारी २०२५ ) हजारो बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत भव्य जनआक्रोश मोर्चा काढला.”भगवान बुद्धांचा विजय असो”, “बुद्धगया आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची”, “बुद्धगया आमच्या तांब्यात द्या” अशा जोरदार घोषणा देत रत्नागिरीच्या रस्त्यांवर जनसमुदायाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

बौद्ध भिक्खूंनी देशभरात उभारलेल्या लढ्याला पाठींबा देत या मोर्चाने जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्यामार्फत भारत सरकारला निवेदन सादर केले.मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर मोर्चा माळनाका येथील लोकनेते श्यामराव पेजे यांच्या पुतळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून बौद्ध धर्मीयांच्या भावना व न्याय्य मागण्या मांडल्या. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, महाबोधी महाविहार हा जागतिक बौद्ध समुदायाच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असून, त्याचे व्यवस्थापन केवळ बौद्ध समाजाकडेच असले पाहिजे.

बोधगया टेंपल ॲक्ट १९४९ या कायद्यातील विसंगती दूर करून, अनुच्छेद २५ आणि २६नुसार धार्मिक स्वातंत्र्याचा संपूर्ण सन्मान करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. बिहारचे मुख्यमंत्री आणि विधीमंडळ यांच्याकडून या संदर्भात सौहार्दपूर्ण व न्याय्य निर्णय अपेक्षित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या मोर्चात अनंत सावंत, प्रीतम रुके, सुरेश सावंत, एल व्ही पवार, व्ही पवार, संजय आयरे, जयरत्न कदम, सौरभ आयरे, मनोहर मोहिते, गौतम गमरे, उमेश पवार, सिद्धार्थ सावंत, राकेश कांबळे, अमोल जाधव, विकास उर्फ अण्णा जाधव, विलास कांबळे, प्रवीण मोहिते, अशोक कदम, समीर पवार, चंद्रकांत जाधव, सतीश जाधव, दीक्षा जाधव, धम्मदीप जाधव, बीके कांबळे, अनिरुद्ध कांबळे यांच्यासह अनेक जिल्ह्यातील संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घेतला.

