गोडबोले विद्यामंदिर, केळ्येचा रौप्यमहोत्सव सांगता सोहळा संपन्न

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्री. शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिर, केळ्ये ता. रत्नागिरी येथे मंगळवार दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचा प्रारंभ शोभायात्रेने झाला. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. डॉ. मुकुंदराव जोशी व गावच्या प्रथम नागरिक सरपंच मा. सौ. सौरभी पाचकुडवे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

या शोभायात्रेमध्ये दोन चित्ररथ तयार करण्यात आले होते. एका चित्ररथामध्ये शाळेच्या स्थापनेपासून आज पर्यंत शाळेमध्ये झालेल्या स्थित्यंतराचा समावेश केलेला होता. तर दुस-या चित्ररथामध्ये या शाळेमधून शिकून गेलेले माजी विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, याची प्रतिकृती तयार करण्यात आलेली होती. सदर शोभायात्रेमध्ये ढोल पथक ,लेझिम पथक, झांज पथक यांचा समावेश होता. त्याच बरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच माजी विद्यार्थी, ग्रामस्थ ,जिल्हा परिषद शाळा केळ्ये मराठी चे विद्यार्थी तसेच शाळेतील विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. या शोभायात्रेचा समारोप गावातील नवलाई मंदिर येथे करण्यात आला. तेथे देवस्थानच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा पाटील मॅडम यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. यात्रेमध्ये सहभागी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ मुकुंदराव जोशी व कार्याध्यक्षा मा. श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी मनोगत व्यक्त करुन उर्वरीत सर्व कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. त्यानंतर नियोजनाप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील बॅचलर ऑफ पर्फोर्मिंग आर्टसच्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. सांगता सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाचा शुभारंभ सायंकाळी ४.३० वाजता दीपप्रज्वलनाने झाला.

विद्यालयातील विद्यार्थिनींनी कै. गोडबोले सरांवर आधारित श्री. एस. जी. घरत यांनी तयार केलेले व श्री. विजय रानडे यांनी संगीत दिलेले गीत आणि स्वागत गीत सादर केले. संस्थेचे सहकार्यवाह तथा शालेय समितीचे अध्यक्ष श्री. श्रीकांत दुदगीकर यांनी प्रास्ताविक करुन विद्यालयातील गेल्या २५ वर्षाचा आढावा घेतला व उपस्थित मान्यवरांचे शाब्दिक स्वागत केले. त्यानंतर जिल्ह्याचे पालक मंत्री तथा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. डॉ. श्री. उदय सामंत यांचा तसेच संस्थेचे मा. अध्यक्ष तथा भारत सरकारचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा आणि विद्युत राज्यमंत्री मा. श्री. श्रीपादजी नाईक यांचा कार्याध्यक्षा मा. शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंचावर उपस्थित संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. मुकुंद जोशी, अॅड्. विलास पाटणे, कार्याध्यक्षा मा. शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड्. विजय साखळकर, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सहकार्यवाह श्री. श्रीकांत दुदगीकर यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. केळ्ये गावाच्या सरपंच मा.सौ. सौरभी पाचकुडवे, शाळेला नित्य सहकार्य करणारे माजी सरपंच श्री. गजानन नाखरेकर, श्री. सुहास सहस्रबुद्धे तसेच शाळेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे गोडबोले सरांचे पुतणे श्री. विकास आणि जयकुमार गोडबोले, श्री. श्रीधर घरत यांचे सत्कार मा. उदयजी सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार श्री. बाळासाहेब माने यांचाही सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शालेय समितीचे सदस्य डॉ. संजय केतकर, डॉ. श्रीराम केळकर तसेच उपस्थित जि. प. माजी सभापती श्री. म्हाप, तहसीलदार श्री. म्हात्रे यांचाही सत्कार करण्यात आला.त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने ही काही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

नामदार डॉ. उदयजी सामंत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, या संस्थेचा माजी विद्यार्थी म्हणून जे जे सहकार्य करता येईल ते ते मी नक्की करेन, त्यामध्ये मी कोणतेही राजकारण करणार नाही. तसेच संस्थेने रत्नागिरी तालुक्याबरोबरच जिल्ह्यामध्ये सुद्धा शिक्षणाचा विस्तार करावा त्यासाठी मी उद्योगमंत्री म्हणून ९९.९९ टक्के नक्की जागा उपलब्ध करुन देईन याची ग्वाही देऊन संस्थेने आत्ताच्या काळात तंत्र शिक्षणाचा सुद्धा प्रसार करण्याची जबाबदारी घ्यावी असे त्यांनी आवाहन केले. तत्पूर्वी संस्थेचे कार्यवाह श्री. सतीश शेवडे यांनी संस्थेला मा. उदय सामंत चांगल्या प्रकारे सहकार्य करीत असल्याचे सांगून यापुढेही सहकार्य करावे असे आवाहन केले. यानंतर या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमात संस्थेच्या देणगीदारांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. त्यामध्ये श्रीमती गीतांजली दातार, श्री. श्रीरंग विनायक रानडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले. यानंतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. गावच्या सरपंच मा.सौ. सौरभी पाचकुडवे यांनी आपल्या मनोगतात सदर कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. गोडबोले सरांचे मानसपुत्र श्री. एस. जी घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या शाळेला याही पेक्षा जास्त ऊर्जा देण्याची गरज असून ग्रामस्थांनी याहीपेक्षा जास्त सहकार्य करावे असे सांगितले. श्री. विकास गोडबोले यांनीही शाळेच्या विकासात आधीप्रमाणेच नंतरही सहकार्य करण्याची भूमिका विशद केली. देणगीदार प्रतिनिधी म्हणून श्रीमती गीतांजली दातार यांनी आपले मनोगत व्यक्त करून देणगीचा धनादेश मान्यवरांकडे सुपूर्त केला. उपाध्यक्ष अॅड्. विलास पाटणे यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपाध्यक्ष डॉ. मुकुंद जोशी यांनी कै. बाबुराव आणि कै.मालतीबाई जोशी यांनी सुरू केलेल्या आणि कै. अॅड्. अरुअप्पा जोशी यांनी विस्तारलेल्या या शैक्षणिक कार्याचा वटवृक्ष बहरताना पाहून आनंद व्यक्त करून पुढील मार्गक्रमणेसाठी शुभेच्छा दिल्या.

मनोगत व्यक्त करताना कार्याध्यक्षा मा. शिल्पाताई पटवर्धन यांनी काही उदाहरणे देत शाळेचे काम कसे चालविले पाहिजे याचे उत्तम मार्गदर्शन केले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा पाटील यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा. ना. श्री. श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. मा. श्री. श्रीपादजी नाईक यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेच्या सर्व घटक संस्थांबरोबरच या छोट्या युनिटकडे त्याच ताकदीने संस्था लक्ष देत असल्याचे सांगून भविष्यामध्ये संस्था तंत्रशिक्षणावर नक्की भर देईल असे सांगितले. त्यानंतर मुख्याध्यापिका सौ. स्नेहा पाटील यांनी सर्व उपस्थितांच्या प्रति आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले. सभेच्या मुख्य कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यावेळी २५ वर्षामध्ये ज्यांनी सहकार्य केले त्या माजी विद्यार्थी, ग्रामस्थ यांना गौरवण्यात आले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांचा सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त केली गेली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रसाळ , सौ. रहाटे यांनी केलेसदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय समिती अध्यक्ष श्री. श्रीकांत दुदगीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा पाटील, शिक्षक श्री. वासुदेव केळकर, सौ. श्रुती रहाटे, सौ, अनघा रसाळ, सौ.निधी मोरे लिपिक श्री. रामचंद्र केळकर, कर्मचारी श्री. हरिश्चंद्र नाखरेकर,महेश सनगरे या सर्वांनी विशेष मेहनत घेतली. तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे आजी माजी सदस्य कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संस्थेच्या सर्व घटक संस्था, त्यांचे कर्मचारी, संस्था पदाधिकारी , आजीव सभासद मंडळ सदस्य, ग्रामस्थ, शाळेतील माजी विद्यार्थी, जि. प. शाळा, ग्रामपंचायत केळ्ये यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button