
सीईटीच्या फेर परीक्षेलाही अडीच हजार विद्यार्थी मुकले
मुंबई :* एमएचटी सीईटीच्या पीसीएम गटाच्या अखेरच्या सत्रातील परीक्षेत २१ प्रश्नांचे पर्याय चुकीचे दिल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) ५ मे रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली. मात्र २७ एप्रिल रोजी परीक्षेला उपस्थित असलेल्या २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ६८५ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले. त्यामुळे सीईटी कक्षाच्या गोंधळामुळे २ हजार ६८५ विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.एमएचटी सीईटीनंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या गावाला जाण्यासाठी किंवा अन्यत्र फिरायला जाण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून २७ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या अखेरच्या सत्रानंतर अनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे नियोजित बुकींगनुसार आपल्या गावाला किंवा परराज्यात गेले.
मात्र परीक्षेनंतर दोन दिवसांनी २९ एप्रिल रोजी सायंकाळी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम गटाच्या अखेरच्या सत्राची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार ५ मे रोजी फेरपरीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आली. फेरपरीक्षेसंदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना मेसेज, ईमेल, व्हॉट्सॲप, सोशल माध्यमाद्वारे कळविण्यात आली. मात्र त्यापूर्वीच अनेक विद्यार्थी हे बाहेरगावी गेलेले असल्याने त्यांना पुन्हा परीक्षेला येणे शक्य नसल्याने ५ मे रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीला २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार १५२ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. राज्य सामाईक प्रवेश परीक्षेने २७ एप्रिल रोजी घातलेल्या गोंधळामुळे २ हजार ६८५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.
यांसर्दभात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र त्यांच्या लॉगिन आयडीमध्ये पाठविण्यात आले असल्याचे सांगितले.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून २७ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या अखेरच्या सत्रासाठी ३१ हजार २० विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेशपत्र पाठविण्यात आले होते. त्यातील २७ हजार ८३७ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले होते. मात्र इंग्रजीतून पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित विषयात २१ प्रश्नांना चुकीचे पर्याय आले होते. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी अखेरच्या सत्रामध्ये परीक्षा दिलेल्या २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आला. मात्र प्रत्यक्ष २५ हजार १५२ विद्यार्थीच फेरपरीक्षेला उपस्थित राहिले. त्यामुळे फेरपरीक्षा हीच विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी ठरल्याचे पाहायला मिळत आहे.