
मृतदेह 2 तास रुग्णालय आवारातच झाकून ठेवला,मानवतेला लाजवणारा प्रकार लांजा तालुक्यातील साटवली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उघडकीस.
उपचाराकरिता दाखल करण्यासाठी आलेल्या रुग्णाला दाखल न करताच रुग्णालयाच्या आवारातच तपासणी करून मृत घोषित केले व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयात न घेता रुग्णालयाच्या आवारातच तब्बल दोन तास झाकून ठेवल्याचा गंभीर व मानवतेला लाजवणारा प्रकार लांजा तालुक्यातील साटवली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उघडकीस आला. या प्रकारामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांसह लांजा तालुक्यातून आरोग्य विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.साटवली येथे घडलेल्या या घटनेबाबत माहिती, अशी दि. 3 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान लांजा तालुक्यातील साटवली येथील विजय केरू भोवड (वय 40) यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना गावापासून जवळ असलेल्या साटवली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचाराकरिता नेण्यात आले.
मात्र, भोवड यांना रुग्णालयात बेडवर न तपासता रुग्णालयाच्या आवारात तपासले व मृत घोषित करून त्यांचा मृतदेह रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच जमिनीवर तब्बल 2 तास झाकून ठेवण्यात आला असल्याचे नागरिकांनी सांगितले. ही घटना मानवतेला लाजवणारी भावनाशून्य असल्याचे व्यक्त होते आहे. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जिजाऊ संस्थेच्या रुग्णवाहिकेमधून भोवड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लांजा येथे पाठविण्यात आला.साटवली प्रा. आ. केंद्राकडे स्वतःची रुग्णवाहिका असताना खासगी गाडीचा वापर का करण्यात आला, असा सवाल उपस्थित होत आहे. माणसाच्या मृत्यूनंतरही मृतदेहाची अशी हेळसांड होत असल्याने आरोग्य विभागाचा निष्कळजीपणा व गलथान कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी नागरिकांतून केली जात आहे.