
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी आंदोलन


रत्नागिरी : आज राष्ट्रवादी भवन मुंबई येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने त्यांना मदत तसेच भरपाई द्यावी यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यात रत्नागिरीचे युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांचाही समावेश होता.


या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणे, जमिनीची माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लाख मदत, पिकांचे नुकसान झालेल्यांना एकरी ५० हजार भरपाई, घरांच्या नुकसानीसाठी ७० टक्के भरपाई तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानांच्या नुकसानीसाठी ७० टक्के मदत देण्याच्या ठोस मागण्या करण्यात आल्या. शेतकरी आणि व्यापारी वर्गाला न्याय मिळालाच पाहिजे, त्यांच्या हक्काची मदत तातडीने मिळाली पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आली. राज्य सरकारने या मागण्या तात्काळ मान्य करून शेतकरी व व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश व जिल्ह्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




