
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे पाच रुपयाच्या बिस्किटाच्या पुड्यावरून पर्यटक कुटुंबाला मारहाण
सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटातील एका स्टॉल धारकाकडून तेलंगणा येथील पर्यटक व त्याच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली. रागाच्या भरात डोक्यात स्टीलचा जग मारल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे.ही घटना आंबोली धबधबा परिसरात घडली. जखमी पर्यटकांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. अधिक तपास सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तेलंगणा-तुंबूर येथील सांगुर्टाला कुटुंबातील दहा पर्यटक आपल्या इर्टिगा गाडीने आंबोली मार्गे कोल्हापूर येथे जात असताना सायंकाळी पावणे चारच्या दरम्यान तेथील एका स्टॉल वर नाश्ता करण्यासाठी थांबले. यावेळी ५०५ रुपयाचे बिल झाले. त्यातील ५०० रुपये त्यांनी दिले वर एक बिस्कीट पुडा घेतला त्याचे ५ रुपये बिल देण्यावरून त्या स्टॉल धारकाने मारामारी केली. यात लक्ष्मी सान्कुर्टाला हिच्या गळ्याला धरले. त्यांचा पति राजेशम याच्या डोक्यावर पाण्याचा स्टील चा जग मारला. यात ते गंभीर जखमी झाले. डोक्यातून रक्तस्त्राव झाला. गुंडा राकेश, चिरनेव्ही रवी, गंडाला सुरेश सांकुर्टाला यांना मारहाण केली.
जखमीना तेथे थांबलेल्या अमरावती येथील पर्यटकानी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. यानंतर येथील डॉक्टर महेश जाधव आणि डॉ. आदिती पाटकर यांनी जखमीवर उपचार केले. डोक्यात गंभीर मारहाण असल्याने त्यावर प्राथमिक उपचार करून सिटी स्कॅन करण्यासाठी सावंतवाडी येथील रुग्णालयात १०८ ने पाठवण्यात आले. याबाबत आंबोली पोलीस स्थानकाचे हवालदार मनीष शिंदे आणि कॉन्स्टेबल अभिजित कांबळे हे आरोग्य केंद्रात जाऊन तक्रार घेतली. यानंतर घटना स्थळी पाहणी केली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस निरीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याशी फोन वरून पर्यटकांनी तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.