
अंगणवाड्यांमध्ये पोषण महिना अभियानाला प्रारंभ
रत्नागिरी : माता आणि बालके सुद़ृढ रहावी यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गतच माता व बालकांना सशक्त करण्यासाठी पोषण महिना अभियान राबविले जात आहे. गुरुवार (1 सप्टेंबर) पासून सुरू झालेले हे अभियान 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम तसेच कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत हवळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील 2871 अंगणवाड्यांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.
पोषण महिना अभियान सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असून माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी त्याचे नियोजन करण्यात आले आहे. महिनाभर चालणारे हे अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार आहे. मातेला पोषक आहार व चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी व त्यांचे योग्यपणे पोषण होण्यासोबतच कुपोषण दूर होण्यासाठीच्या विविध उपायांचा व उपक्रमांचा त्यात समावेश आहे.
या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन कालावधी दरम्यान हात स्वच्छ धुण्याचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. तसेच महिन्याच्या कालावधीत एकदा गावांमध्ये प्रभातफेरी काढून आरोग्य व पोषण विषयक संदेशाचा प्रचार व प्रसार करण्यात येईल. त्याचप्रमाणे अनेमियामुक्त भारत कार्यक्रमाअंतर्गत नियुक्त केलेल्या शाळांच्या नोडल अधिकार्यांच्या मदतीने पोषण माहमध्ये नियमितरीत्या शाळेतील मुलांना मध्यान्ह भोजन दरम्यान लोहयुक्त गोळ्यांचे वाटप व सेवन होईल असे नियोजन करण्यात येणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण महिना अभियान कालावधी दरम्यान एक टी-3 कॅम्पचे आयोजन करून विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात येईल. तसेच पोषण मोहिमेमध्ये एएनएम आणि आशा स्वयंसेविका या गृहभेटी देऊन जनजागृती करणार आहेत.




