
शिवरायांचा अपमान, शिवप्रेमींचा संताप! तरुणाला दिला बेदम चोप
गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत अपमानस्पद वक्तव्ये करुन सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन नवा वाद उभा करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरमध्ये प्रशांत कोरटकर याने शिवरायांबद्दल अर्वाच्च भाषा वापरली होती ज्यानंतर राज्यभरात शिवप्रेमींचा संताप पाहायला मिळाला होता.असाच प्रकार नालासोपाऱ्यात घडला असून शिवरायांचा अपमान करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.नालासोपारा पूर्वेच्या विजय नगर येथील हिल व्ह्यू सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका इसमाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने संतप्त शिवप्रेमींनी त्याला चांगलाच चोप दिला आहे. अक्षयदीप भरतकुमार विसावाडिया असे या आरोपी इसमाचे नाव असून शिवप्रेमींनी त्याला पोलिसांच्या हवाली केलं आहे.
याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. सध्या या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.