
राहुल गांधी यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याची घोषणा!
ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की राहुल गांधी आता हिंदू धर्माचा भाग राहिलेले नाहीत.त्यांनी त्यांना हिंदू धर्मातून सार्वजनिकरित्या बहिष्कृत करण्याची घोषणा केली आहे.बद्रीनाथ येथील शंकराचार्य आश्रमात पत्रकारांशी बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, राहुल गांधी यांनी संसदेत मनुस्मृतीबाबत केलेल्या विधानामुळे सनातन धर्माचे सर्व अनुयायी दुखावले आहेत.
शंकराचार्य म्हणाले की, राहुल गांधी संसदेत म्हणतात की बलात्कारीला वाचवण्याचे सूत्र संविधानात लिहिलेले नाही तर तुमच्या पुस्तकात म्हणजेच मनुस्मृतीत लिहिलेले आहे.ते म्हणाले की, राहुल गांधींना तीन महिन्यांपूर्वी एक नोटीस पाठवण्यात आली होती ज्यामध्ये त्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले होते की त्यांनी जे म्हटले आहे ते मनुस्मृतीत कुठे लिहिले आहे? पण इतक्या वेळानंतरही राहुल गांधींनी कोणतेही उत्तर दिले नाही किंवा माफी मागितली नाही.शंकराचार्य म्हणाले, “जेव्हा एखादी व्यक्ती सतत हिंदू धर्मग्रंथांचा अपमान करते आणि स्पष्टीकरण देण्यास टाळाटाळ करते, तेव्हा त्याला हिंदू धर्मात स्थान देता येत नाही.” त्यांनी स्पष्ट केले की आता राहुल गांधींना मंदिरांमध्ये विरोध केला पाहिजे आणि पुजाऱ्यांना त्यांची पूजा करू नका असे आवाहन केले कारण त्यांना आता स्वतःला हिंदू म्हणवण्याचा अधिकार नाही.शंकराचार्य यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे




