
डॉ. सुशिम सपकाळ यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा
वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बैठकीत नवचैतन्य
रत्नागिरी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक पदावरून जबाबदारी संपविल्यानंतर, प्रथमच डॉ. सुशिम सपकाळ यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला.
दुपारी १.०० ते सायंकाळी ४.३० या वेळेत झालेल्या या बैठकीत रत्नागिरी जिल्हा दक्षिण व उत्तर विभाग, वंचित बहुजन युवा आघाडी आणि महिला आघाडीच्या तालुका निहाय कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच पंचायत समिती गण व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यात आली.
बैठकीदरम्यान विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. चिपळूण तालुक्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रामदास आठवले गट) संदेश कदम व समर्थक तसेच रत्नागिरी तालुक्यातून ओबीसी नेते कृष्णाजी शिवा कोकमकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. सर्वांचे स्वागत डॉ. सुशिम सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा दक्षिण विभागाचे अध्यक्ष गौतम गमरे यांच्या समता नगर, धामणी येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात पार पडला. सूत्रसंचालन रत्नागिरी जिल्हा दक्षिण विभागाचे महासचिव सिद्धार्थ कांबळे यांनी केले.
या वेळी गोवा राज्य वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत पार्सेकर, विपुल पार्सेकर, उत्तर विभागाध्यक्ष सादिकभाई काझी, राजेश मर्चडे, भूषण पवार, तसेच विविध तालुक्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना डॉ. सपकाळ म्हणाले, “पदासाठी नव्हे, पक्षासाठी काम करा. प्रत्येक गावात शाखा व बूथ स्तरावर संघटन उभारा. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासारखे वातावरण निर्माण करा.”
शेवटी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत, लवकरच पुन्हा जिल्हा दौरा करून कामाचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले.




