
यंदा वेळेआधीच मान्सूनचं आगमन?
हवामान विभागाच्या नुकत्याच करण्यात आलेल्या निरीक्षणातून समोर आलं असून, मान्सूनच्या रुपात ही आनंदवार्ता लवकरच दार ठोठावणार असल्याची वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.हवामान अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार यंदा वेळेआधीच मान्सून निकोबार बेटांवर दाखल होणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर मागील काही दिवसांपासून ढगांच्या हालचाली वेगानं सुरू असून वाऱ्याच्या वेगातही सातत्यपूर्ण बदल पाहायला मिळत असल्यानं यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अंदमान आणि निरोबार बेटांवर दाखल होणाऱ्या मोसमी वाऱ्यांच्या धर्तीवर देशातील मान्सूनचं प्रमाण आणि त्याचा वेग याविषयीचे अंदाज वर्तवण्यात येतात. सहसा मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये मोसमी पावसाच्या आगमनाची अपेक्षा असते. यावेळी मात्र जणू तो सर्वांचीच विनवणी ऐकत आठवडाभर आधीच दाखल होणार असल्याची चिन्हं आहेत. अगदी तारखेचाच विषय म्हणावा तर, यंदा 10 मे पर्यंत मोसमी पाऊस अंदमान निकोबार इथं दाखल होऊ शकतो.