
जलजीवन योजनेचे पाईप आगीत खाक.
चिपळूण : वालोपे भोजवाडी येथे जलजीवन मिशन योजनेसाठी सुमारे दहा लाखांचे पाईप आणून ठेवण्यात आले होते. शुक्रवारी (ता. २) दुपारी लागलेल्या आगीत ते भस्मसात झाले. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी ग्रामपंचायतीच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सांयकाळी उशिरापर्यंत सुरू होते. ही आग वणव्यामुळे लागल्याचे सांगितले जात आहे.चिपळूण तालुक्यातील वालोपे गावाला २४ तास पाणी मिळावे यासाठी मागील काही वर्षापासून स्थानिक ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नाला यश आल्यानंतर पाणी योजनेची प्रक्रिया सुरू झाली होती. तसेच या योजनेसाठी शासनाने निधी मंजूर केला होता. या योजनेसाठी लासणारे पाणी आणून त्याचावेगवेगळ्या ठिकाणी साठा करण्यात आला होता. वालोपे-भोजवाडी येथे सुमारे दहा लाखांचे पाईप आणून मुंबई-गोवा महामार्गालगत सीएनजी पंपापासून काही अंतरावर ठेवण्यात आले होते.
२ मे रोजी दुपारी २.३० वाजता त्यांना अचानक आग लागली.सरपंच प्रतीक सुर्वे, उपसरपंच समिधा कदम, सदस्य सुनील मोहिते, प्रवीण आग्रे, पूजा पिंपुटकर, ग्रामसेवक विश्वास पवार, नीलेश गुरव व ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. आगीवर नियंत्रणासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पालिकेच्या व लोटे एमआयडीसीतील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले; मात्र ते पोचेपर्यंत पाईप जळून खाक झाले होते. हे पाईप सिमेंट क्रॉंक्रीट केलेल्या जागेवर ठेवण्यात आले होते. मात्र परिसरात सुकलेले गवत होते. त्या गवताला आग लागली. त्यानंतर पाईप जळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.