
गोव्यातील लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी, ६ जणांचा मृत्यू; १५ पेक्षा जास्त भाविक जखमी!
- गोव्यातील शिरगावमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शिरगाव येथील श्री लैराई देवीच्या यात्रे दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीच्या घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच १५ पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
गोव्यातील शिरगाव या ठिकाणी शुक्रवारी रात्री उशिरा श्री लैराई देवीच्या यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली आणि मोठा गोंधळ उडाला. यामध्ये ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जखमींना गोवा येथील वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील घटनेचा आढावा घेतला असून चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या भाविकांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. दरम्यान, लैराई देवीची यात्रा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. राज्यभरातून आणि परदेशातून देखील भाविक लैराई देवी च्या यात्रेसाठी येत असतात. या उत्सवात भव्य मिरवणूक काढली जाते. मात्र, या वर्षी या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरीची दुर्देवी घटना घडली आणि या घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे.
गोवा काँग्रेसने काय म्हटलं?
“शिरगाव येथील श्री लैराई देवीच्या यात्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत आम्ही दुःख व्यक्त करतो. या घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्या कुटुंबियांप्रति आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो. तसेच या घटनेत जखमी झालेले भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो”, असं गोवा काँग्रेसने एक्सवर (ट्विटर)केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.