
गगनबावडा तालुक्यातील अणदूर येथील तलावात बोट उलटल्याने चौघा जणांपैकी एकाचा मृत्यू
पर्यटनासाठी आले असता गगनबावडा तालुक्यातील अणदूर येथील तलावात बोट उलटल्याने चौघा जणांपैकी एकाचा मृत्यू झाला. सचिन संभाजी जगदाळे (वय ३१, रा. आंबवडे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांनी दुपारी सायंकाळी सव्वातीन वाजता मृतदेह पाण्याबाहेर काढला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सचिन जगदाळे हा शिरोली पुलाची येथे जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. तो एक मे रोजी सुटीच्या निमित्ताने आदित्य विनायक पाटील, समर्थ उदय ठाकूर (दोघे रा. पुलाची शिरोली) व शिवतेज प्रकाश स्वामी (रा. नागाव ता. हातकणंगले) या तीन मित्रांसोबत पर्यटनास गगनबावडा तालुक्यात आला होता.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सचिन व त्याचे तीन मित्र अणदूर तलावामध्ये जल पर्यटन, बोटिंग करत असताना त्यांची बोट पाण्यात उलटली. मध्यभागी असल्याने पाण्याची खोली अधिक होती. जिवाच्या आकांताने तिघेजण पोहत पाण्याबाहेर आले. पण, सचिन पाण्याच्या तळाशी गेला. तिघांनी सचिनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. सचिनचा भाऊ स्वप्नील जगदाळे व जिमचे मालक वैभव व्हनागडे हे सचिनच्या शोधासाठी रात्री अणदूर तलावाच्या ठिकाणी पोहोचले.
मात्र, तलाव परिसरात अंधार असल्याने सचिनचा शोध घेता आला नाही. शुक्रवारी सकाळपासूनच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जवानांच्या मदतीने सचिनचा शोध घेतला. आठ तासांच्या शोधमोहिमेत अखेर दुपारी सव्वातीन वाजता सचिनचा मृतदेह मिळाला.