
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात चेष्टामस्करीतून २ कामगारांचा धारदार शस्त्राने भोसकून खून.
Bbसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील क्रशरवर वेल्डिंगचे काम करणाऱ्या कामगाराने आपल्याच दोन सहकारी कामगारांना धारदार शास्त्राने भोसकून निर्घृणपणे ठार केले.ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.३०) रात्री ११ च्या सुमारास घडली. धनेश्वर सत्यनारायण चोधरी (वय ६६, रा. अंबड, नाशिक) आणि मनोज सिंग (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. तर संजय बाबुराव लोखंडे (वय ३८, रा. नाशिक) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
या घटनेची खबर विजय शंकर जयस्वाल याने पोलीस ठाण्यात दिली. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, नाधवडे कुंभजाई माळानजीक हरेश जनक यांच्या नवीन क्रशर जोडणीचे काम सुरु आहे. नाशिक येथील एपीसी इंजिनिअरींग कंपनी हे काम करीत आहे. कंपनीच्या मुकादमसह परजिल्ह्यातील सात कामगार गेल्या १० मार्चपासून येथे काम करीत आहेत. बुधवारी अक्षयतृतीया असल्यामुळे दुपारपर्यंत काम करून काही कामगार दुपारनंतर वैभववाडी बाजारपेठत दारू पिण्यासाठी आले होते. दारू पिऊन झाल्यानंतर सोबत न आलेल्यासाठी ते दारू घेऊन नाधवडे येथे गेले. रात्री परत सगळ्यांनी एकत्र दारू पिऊन जेवण केले. त्यानंतर संशयित आरोपी संजय लोखंडे व मृत धनेश्वर चौधरी हे दोघे आपआपसांत चेष्टामस्करी करीत होते. इतर सहकारी कामगार झोपण्यासाठी गेले. संतोष यादव त्यांच्या रूम मध्ये झोपायला गेला. त्यातील विजय जयस्वाल हा मोबाईल घेऊन खोलीच्या बाहेर असलेल्या लोखंडी प्लेटवर झोपला होता.यावेळी मृत मनोज सिंग व आरोपी संजय लोखंडे हे चेष्टामस्करी करीत खोलीच्या समोर अंधाराच्या दिशेने निघून गेले होते.
याच दरम्यान जयस्वाल यांना झोप लागली. मात्र, रात्री १०.४० वाजताच्या सुमारास समोरच्या कामगाराच्या खोलीतून ओरडल्याचा आवाज आला. त्याने जयस्वाल यांना जाग आली. त्यावेळी संजय लोखंडे हा धनेश्वर चौधरी याच्या पोटावर बसून त्याला चाकू सारख्या धारदार हत्याराने छातीवर वार करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याने अन्य कामगारांना जागे करून संजय लोखंडे याला बाजूच्या खोलीत बंद करून ठेवले. यावेळी त्यांनी मनोज सिंग चा शोध घेतला असता काही अंतरावर तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.