मे महिन्यात दिलासा; मुंबईतील तापमानात घट होणार!

मुंबई :* मे महिन्यात मुंबईकरांसाठी तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता असून प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि उपनगरांमध्ये तापमानात २ ते ३ अंस सेल्सिअसची घट होऊ शकते. यामुळे या दिवसांत तापमानवाढीचा सामना फारसा करावा लागणार नसल्याचा अंदाज आहे. गेले काही दिवस मुंबईतील तापमानात सतत चढ- उतार होत आहेत. तापमानवाढ नसली तरी वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेने मागील काही दिवस हैराण केले.दिवसभर उकाडा आणि घामाच्या धारा अशा वातावरणाला मुंबईकरांना सामोरे जावे लागत होते. दरम्यान, तापमानात होणारी घट मुंबईकरांसाठी थोडासा दिलासा देऊ शकते, मात्र उष्णतेपासून पूर्णत: सुटका होण्याची शक्यता नाही. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३४.१ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर अरबी समु्द्रातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे तापमानात काहिशी घट होईल. मात्र, त्यामुळे आर्द्रतेत वाढ होणार असून उकाडा सहन करावा लागेल.

दरवर्षी मे महिन्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वादळांचा अप्रत्यक्ष परिणाम मुंबईच्या हवामानावर होतो. उदा. ढगाळ वातावरण, वाऱ्यांचा वेग वाढणे आदी.

प्रादेशिक हवामान विभागाच्या मते, उत्तर भारतात पडणाऱ्या उष्णतेच्या लाटा जर कमी झाल्यास मुंबईतील तापमानातही घट होते. यंदा उत्तर भारतात एप्रिलमध्येच उष्णतेची लाट आल्याने मे महिन्यात मुंबईत तापमान तुलनेने कमी राहील.*पूर्वमोसमी पावसाला प्रारंभ*मे महिन्याच्या अखेरीस हवामानात अचानक बदल होतात. जसे की, ढगाळ वातावरण, विजा चमकणे आणि जोरदार वारे वाहणे हा बदल पू्र्वमोसमी पावसाची चाहूल देणारा असतो.

राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. दुपारी उन्हाचा चटका आहे, तर सायंकाळी काही भागात हलक्या सरी कोसळत आहेत. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अकोला जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी तर, बुलढाणा, वाशीम आणि अमरावती जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी काही ठिकाणी विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

विदर्भात तापमानाचा पारा चढाच आहे. गुरुवारी सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे झाली. तेथे ४४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल अमरावती ४२.८ अंश सेल्सिअस, वर्धा ४२.१ अंश सेल्सिअस, वाशिम ४२.६ अंश सेल्सिअस, जळगाव ४४.२ अंश सेल्सिअस, पुणे ४१.२ अंश सेल्सिअस, लोहगाव ४३. अंश सेल्सिअस आणि सोलापूर येथे ४४.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button