टेरव मंदिराचा १४वा वर्धापनदिन ८ मे रोजी

चिपळूण : श्री क्षेत्र टेरव येथील आद्यशक्ती कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई शक्तीपिठाचा चौदावा वर्धापन दिन सोहळा ८ मे रोजी मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आदिशक्ती कुलस्वामिनी श्री भवानी जगदंबा माता, अबाल वृद्धांचे श्रद्धास्थान, महाराष्ट्राचे कुलदैवत आणि ग्रामदैवत श्री वाघजाई मातेसह इतर देवतांची स्थापना अंदाजे ५०० वर्षापूर्वी सन १५१० ते १५१२ या काळात टेरव येथे करण्यात आली. हिरव्यागार देवरहाटीमध्ये वसलेल्या या मंदिराची दुरावस्था झाल्यामुळे सन १८३९ साली सदर मंदिराचा पहिल्यांदा जीर्णोद्धार झाल्याची इतिहासात नोंद आहे.

त्यानंतर या जुन्या लाकडी कौलारू मंदिराच्या नवीन वास्तू उभारणीचा संकल्प करून ८ मे २०११ रोजी या नूतन मंदिराचे उद्घाटन व कलशारोहण श्रीमंत जगतगुरु शंकराचार्य, करवीर पीठ, कोल्हापूर, यांचे शुभहस्ते आणि ह.भ.प. भारती महाराज, आळंदी देवाची यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मंदिर स्थापत्यशास्त्राच्या कलात्मकतेचा एक उत्कृष्ट नमुना असून, आई भवानी वाघजाई मातेचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना आंतरिक बळ मिळते तसेच मंदिराच्या प्रांगणात आगळे वेगळे समाधानही लाभते.१४ व्या वर्धापन दिनानिमित्त ८ मे २०२५ रोजी सकाळी अभ्यंगस्नान, अभिषेक, नवचंडी याग, नवचंडी हवन, महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ, दुपारी महाआरती, महाप्रसाद व संध्याकाळी महाआरती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने या देवस्थानास पर्यटनाचा क दर्जा तसेच तीर्थ क्षेत्राचा ब दर्जा बहाल केला आहे.

कोकणातील दाक्षिणात्य पद्धतीने बांधलेले हे भव्यदिव्य मंदिर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरले आहे. नागमोडी रस्ता, भव्य मंदिर, भैरी भवानी, वाघजाई, महालक्ष्मी, कुलस्वामिनी आणि नवदूर्गांसह इतर देवतांच्या आकर्ष मूर्ती, प्रशस्त उद्यान आणि देवरहाटीतील गारवा यामुळे या ठिकाणी पर्यटक आकर्षित होत आहेत. श्री क्षेत्र टेरव येथील कुलस्वामिनी श्री भवानी – वाघजाई मंदिर हे धार्मिक, अध्यात्मिक केंद्राबरोबरच एक नवीन पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे. सर्वांनी या मंदिराच्या चौदाव्या वर्धापनदिनी सहपरिवार, मित्रमंडळींसह उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button