
जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर शिरवली (ता. लांजा) येथील सृष्टी सुरेश कुळ्ये हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशात ८३१ रँक मिळविली.
बेताची परिस्थिती, शिकवणी नाही, तरीही असलेल्या परिस्थितीचा सामना करत आणि परिस्थितीचा काेणताही विचार न करता जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर शिरवली (ता. लांजा) येथील सृष्टी सुरेश कुळ्ये हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशात ८३१ रँक मिळविली आहे.लेकीने मिळविलेल्या यशानंतर आई-वडिलांच्या डाेळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.सृष्टी कुळ्ये ही मूळची लांजा तालुक्यातील शिरवली पलीकडचीवाडी येथील राहणारी, सध्या ती मुंबईत राहते. तिचे वडील सुरेश कुळ्ये हे मुंबईत एका प्रिंटिंग प्रेसमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून काम करतात, तर आई गृहिणी आहे. सृष्टी हिला दोन भावंडे असून, ती या सर्वात मोठी आहे. घरची परिस्थिती बेताची आहे, तरीही सृष्टी हिने केवळ जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर सृष्टी हिने यूपीएससीमध्ये यश संपादन करत देशात ८३१ रँक मिळवली.
सृष्टी मुंबईतील मानखुर्द शिवनेरीनगर येथील झोपडपट्टीत राहत असल्याने या ठिकाणी तिचा अभ्यास हाेत नव्हता. त्यामुळे तिने सन २०२२ मध्ये गोवंडी येथील एम. पॉवर लायब्ररीत प्रवेश घेतला. घरात कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक वातावरण नाही. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे काेणतीही शिकवणी नाही. अशा परिस्थितीतही सृष्टी हिने केवळ इच्छाशक्ती आणि अभ्यासाच्या जोरावर गरुडझेप घेतली. तिने मिळविलेल्या या यशानंतर शिरवली युवक मंडळ आणि कुळ्ये परिवाराकडून तिचा सत्कार करण्यात आला.