66 वा महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त पालकमंत्र्यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना विकासात्मक प्रकल्पांच्या वाढीसाठी रत्नागिरीकरांचे सहकार्य आवश्यक – पालकमंत्री डॉ. उदय सामंत.

रत्नागिरी, दि. 1 : विविध क्षेत्रामध्ये निधी उपलब्ध करुन देण्याचे काम महाराष्ट्र शासन करतय. त्यातला एक अभिनव प्रकल्प रत्नागिरीमध्ये होतोय. पांढरा समुद्र ते मिऱ्या हा जो साडेतीनशे कोटी रुपये खर्च करुन होणार बंधारा आहे. हा भविष्यात महाराष्ट्रातील नाही, देशातील नाही तर परदेशातील पर्यटकांनादेखील आकर्षित करेल. अशा पध्दतीचे पर्यटन स्थळ वर्षभरात साकार करतोय. जिल्ह्यातील विकासात्मक प्रकल्पांच्या वाढीसाठी रत्नागिरीकरांचे सहकार्य आवश्यक आहे. ते सहकार्य करण्याचा संकल्प आज महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांनी मिळून करु, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. सामंत यांनी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना दिली.यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देवून, पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, महाराष्ट्र स्थापनेसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अशा लढवय्या वीरांना याप्रसंगी अभिवादन करतो. आजचा दिवस महाराष्ट्रातील सर्वांसाठी ऐतिहासिक असा दिवस आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेकांनी, साहित्यिकांनी संघर्ष केला आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेची ही मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. रत्नागिरीकरांच्यावतीने मी नरेंद्र मोदींना धन्यवाद देतो. रत्नागिरी जिल्हा हा साहित्यिकांचा जिल्हा आहे. रत्नागिरी तालुक्यात असलेले केशवसुत स्मारक, ज्या मालगुंडमध्ये केशवसुतांचा जन्म झाला, त्या गावाला पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला, माझ्या विभागाने घेतला. नुसता निर्णय घेतला नाही, तर त्याची अंमलबजावणी देखील झाली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 360 कोटीचा निधी 100 टक्के खर्च केला आहे. या वर्षीदेखील महाराष्ट्र शासनाने अधिकची भर टाकली आहे. तोदेखील आम्ही 100 टक्के खर्च करु, हा विश्वास मी रत्नागिरीमधील तमाम नागरिकांना देतो. रत्नागिरी शहर हे ऐतिहासिक शहर आहे. पर्यटनाच्यादृष्टीने शहराची वाढ व्हावी, यासाठी महाराष्ट्रातील सर्वात देखणी शिवसृष्टी शहरामध्ये उभी राहिली. मला सांगतांना आनंद होतोय ज्या दिवशी या शिवसृष्टीचा लोकार्पण झाला तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 20 हजार महाराष्ट्रातील, परदेशातील नागरिकांनी या पर्यटनस्थळाला भेट दिली आहे. छावा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दीडवर्ष आधी शहरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये आपल्याला यश आले आहे. हजारो पर्यटकांनी पुतळ्याला भेट दिलेली आहे. देशातला पहिला थ्रिडी मल्टीमीडिया शो हा रत्नागिरीमध्ये तयार केला. सुमारे 20 कोटी रुपये खर्च केले आणि या दीड महिन्यामध्ये सुमारे 5 हजार पर्यटकांनी आणि विशेषत: त्याच्यामध्ये विदेशातील पर्यटक आहेत, त्यांनी हा शो पाहिला.

छत्रपती शिवाजी महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या सगळ्यांचा उल्लेख, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख आणि 6 भारतरत्नांचा उल्लेख या शोमध्ये महाराष्ट्र शासनाच्यावतीने करण्यात आलेला आहे. आरेवारे समुद्र किनाऱ्यासमोर 96 एकरमध्ये फारमोठे कृषी पर्यटन करण्याच्या मनस्थितीत महाराष्ट्र शासन आहे. एडव्हँन्चर पार्कसाठी नियोजन मंडळातून पहिल्या टप्प्यात 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. रत्‍नागिरी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, हा संकल्प आपण सर्वांनी मिळून करुया. विविध क्षेत्रामध्ये निधी उपलब्ध करुन देण्याचे काम महाराष्ट्र शासन करतंय आणि त्यातला एक अभिनव प्रकल्प रत्नागिरीमध्ये होतोय. तो म्हणजे, पांढरा समुद्र ते मिऱ्या हा जो साडेतीनशे कोटी रुपये खर्च करुन होणार बंधारा आहे. हा भविष्यात महाराष्ट्रातील नाही, देशातील नाही तर परदेशातील पर्यटकांनादेखील आकर्षित करेल.

उद्योग क्षेत्रामध्ये देखील रत्नागिरीने उत्तुंग भरारी घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये को का कोला सारखा प्रकल्प 2 महिन्यामध्ये कार्यान्वित होतोय, असे सांगून पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, आपल्या रत्नागिरी तालुक्यात व्हीआयटी सेमी कंडक्टर कंपनी आणि धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर आणि निबे डिफेन्स क्लस्टर असे 30 हजार कोटींचे प्रकल्प पुढच्या दोन वर्षात उभे राहणार आहेत आणि त्यामधून 20 हजार मुला-मुलींना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पांच्या वाढीसाठी देखील रत्नागिरीकरांचे सहकार्य आवश्यक आहे. ते देखील सहकार्य करण्याचा संकल्प आज महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांनी मिळून करु. पालकमंत्री डॉ. सामंत यांनी परेड निरीक्षण केले. पोलीस दलांनी संचलन करुन सलामी दिली. यात पोलीस दल, महिला पथक, बँड पथक, गृहरक्षक दल, महिला गृहरक्षक दल, श्वान पथक, फायर टेंडर मिनी रेस्क्यु वाहन, अग्नीशामन मोटार बाईक आदींचा समावेश होता. परेड कमांडर परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी निखील पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन पार पडले.

उल्लेखनीय केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह सुधाकर रहाटे, संजय मुरकर, दिपक पवार, महेश मुरकर, राजेंद्र सावंत, नितीन डोळस, दिनेश आखाडे, विजय मोरे, प्रकाश झोरे, सोनाली शिंदे, दिपक ओतारी, मिलिंद कदम, प्रितेश शिंदे, संतोष सडकर, रमेश चव्हाण यांच्या सन्मानचिन्ह व प्रशिस्तपत्र देवून पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जागतिक वसुंधरा‍दिनानिमित्त पर्यावरणाचे सरंक्षण व संवर्धन करणे या कार्यक्रमांतर्गत स्पर्धांचे आयोजन करुन निवड झालेल्या राधिका दुसार व आराध्या टाकळे यांचाही गौरव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button