
एटीएममधून पैसे काढणं आजपासून महागणार! मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास किती पैसे द्यावे लागणार?
:* तुम्ही जर वारंवार एटीएममधून पैसे काढत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती जाणून घेणं महत्वाचं असणार आहे. कारण आता आजपासून (१ मे २०२५) एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे. त्यामुळे याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होऊ शकतो. कारण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम इंटरचेंज फी वाढण्यास मान्यता दिली आहे.त्यामुळे आता एटीएममधून पैसे काढणे किंवा तुमच्या बँक अकाउंटमधील शिल्लक तपासणं देखील महागणार आहे. एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्काबाबत नवीन नियम आजपासून लागू करण्यात आले आहेत. आता एटीएममधून मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास अतिरिक्त २ रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला याच फटका सहन करावा लागू शकतो.
आज १ मे २०२५ पासून लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, ग्राहकांना आता त्यांची मोफत पैसे काढण्याची मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी अतिरिक्त २ रुपये द्यावे लागतील. तसेच एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मासिक मर्यादा ओलांडल्यानंतर ग्राहकांना एटीएममध्ये २१ रुपयांऐवजी प्रत्येक व्यवहारासाठी २३ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे वारंवार एटीएममधून पैसे काढताना आता विचार करावा लागणार आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.*सुधारित एटीएम शुल्क काय आहेत?*रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन नियमांनुसार, मेट्रो शहरांमधील ग्राहक दरमहा फक्त ३ वेळा एटीएममधून मोफत पैसे काढू शकतात. तसेच नॉन मेट्रो शहरांतील ग्राहक दरमहा ५ वेळा एटीएममधून मोफत पैसे काढू शकतात. मात्र, यापेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढल्यास त्यासाठी पुढील प्रत्येक व्यवहारासाठी २३ रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. तसेच हा नियम एटीएममधून रोख रक्कम काढताना आणि बॅलन्स चेक किंवा मिनी स्टेटमेंटसाठी देखील लागू असणार आहे.
दरम्यान, ग्राहकांनी त्यांच्या मोफत व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यानंतर हे सुधारित शुल्क आकारले जाणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या शिफारशींनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या सुधारणांचा एक भाग म्हणून एटीएम शुल्कात वाढ करण्यात आली आहे. तसेच वाढत्या ऑपरेशनल खर्चामुळे व्हाईट-लेबल एटीएम ऑपरेटर आणि बँका या वाढीच्या संदर्भात मागणी करत होत्या. बँकांची ही मागणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्य केली आहे. मात्र, याचा ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे.