
राज ठाकरेंच्या घराबाहेर अचानक पोलिसांनी गस्त वाढवली, दोन्ही गेटवरील सुरक्षेतही वाढ!
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या घराबाहेर अचानक गस्त का वाढवण्यात आली?
याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण त्यामागे काहीतरी ठोस कारण असण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. पण पोलिसांच्या या कृतीवरुन राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर थेट सरकारवरच निशाणा साधला आहे. त्यांच्या आरोपांवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर स्थानिक पोलिसांनी गस्त वाढवली आहे. ही गस्त नेमकी का वाढवण्यात आली ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण दर दोन तासांनी राज ठाकरेंच्या घराबाहेर पोलिसांकडून गस्त घातली जात आहे. एवढंच नव्हे तर शिवतीर्थ निवासस्थानाच्या दोन्ही गेटवर स्थानिक पोलिसांनी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे कालच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ घराबाहेर ड्रोनने घिरट्या मारल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावरुनही राजकारण तापलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरेंच्या निवासस्थानाच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून साताधाऱ्यांच्या विरोधात रोखठोक भूमिका मांडत आहेत. तसेच मतदारयाद्यांमध्ये जो घोळ झालाय त्यावरुन त्यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताना दिसत आहेत. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
सुरक्षेवरुन आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण
दरम्यान, राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यावरुन राजकारण तापलं आहे. “राज ठाकरे यांना धोका आहे म्हणून सुरक्षा वाढवली की सत्ताधाऱ्यांना त्यांची भीती आहे म्हणून वाढ केली?”, असा प्रश्न काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच “या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल”, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. तर मंत्री संजय शिरसाट यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. “एखाद्या नेत्याला सुरक्षा देताना असलेली कमिटी जी डीजींच्या अंतर्गत असते, ती कमिटी कुणाच्या सुरक्षेत वाढ करायची ते ठरवते. कुणालाही जाणीवपूर्वक सुरक्षा देणे किंवा काढणे हा प्रकार होत नाही”, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.




