महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही.

मुंबई, :- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राज्यात विविध इमारतींची कामे सुरु असून ही कामे पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिल्या. तसेच वक्फ मंडळासमोरील समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

राज्य वक्फ मंडळाशी संबंधित विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन (दूरदृश्य प्रणालीद्वारे), छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी, मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद तसेच विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील मुस्लिम बांधवांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सेवा व इतर आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या गरजा लक्षात घेऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.

समाजातील युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण व प्रशिक्षण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील.या बैठकीत वक्फ मंडळाच्या संपत्ती व्यवस्थापन, निधी वितरण, शिक्षण व इमारत प्रकल्पांशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना कार्यवाहीसाठी सूचना देत वक्फ मंडळाच्या समस्या दूर करण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. *****

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button