
मडगाव स्थानकावर आढळली मध्य प्रदेशातील अल्पवयीन, 19 वर्षीय तरुण ताब्यात.
मध्य प्रदेश राज्यातील एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर आढळल्याने खळबळ उडाली. दरम्यान तिच्यासोबत असलेला अजय चौधरी नावाच्या १९ वर्षीय तरुणाला कोकण रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तसेच या अल्पवयीन मुलीला म्हापसा येथील ‘अपना घर’ या शासकीय देखरेख गृहात पाठवण्यात आले आहे.मध्य प्रदेश पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून तेथील एक पथक गोव्यासाठी रवाना झाले आहे.
हे पथक गोव्यात दाखल झाल्यावर या तरुणाला आणि मुलीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.कोकण रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि.२७) कोकण रेल्वे पोलीस कर्मचारी मडगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर गस्त घालत होते.त्यावेळी त्यांना ही मुलगी एका मुलासोबत संशयास्पद अवस्थेत दिसली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन रेल्वे स्टेशनच्या कार्यालयात आणले. तिथे चौकशी केल्यानंतर परिस्थिती समोर आली.