
जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत वरद पेठे विजेता आयुष मयेकरला उपविजेतेपद.
रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कै. लीला रामचंद्र फडके स्मृती २५ वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद रत्नागिरीच्या वरद पेठे याने प्राप्त केले. वरदने अत्यंत अटीतटीच्या अंतिम फेरीत सोहम रुमडे विरुद्धचा डाव जिंकत निर्विवाद प्रथम स्थान पटकावले. रत्नागिरीच्याच आयुष मयेकर याने अंतिम फेरीत निधी मुळ्ये विरुद्धचा डाव जिंकत पाच गुणांसह उपविजेतेपदाला गवसणी घातली.चिपळूणचा साहस नारकर व प्रणव मुळ्ये यांच्यातला अंतिम फेरीचा डाव बरोबरीत सुटल्याने साहस तिसरा तर प्रणव चौथा आला. निधी मुळ्ये हिने पाचवे तर श्रीहास नारकरने सहावे स्थान प्राप्त केले.
नवोदित खेळाडू अन्वय अंबिके याने स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. अन्वयने यश गोगटे , आयुष रायकर यांचे विरुद्धचे महत्वाचे सामने जिंकत खुल्या गटात सातवा क्रमांक पटकावला.
उत्तेजनार्थ पारितोषिके पुढीलप्रमाणे.अनरेटेड प्रथम : कौस्तुभ हर्डीकर
१५ वर्षे वयोगट : अपूर्व बंडसोडे , सई प्रभुदेसाई
१२ वर्षे वयोगट : ओम तेरसे
०९ वर्षे वयोगट : शर्वील शहाणेस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जिल्ह्यातील अनुभवी बुद्धिबळपटू सुहास कामतेकर यांच्या हस्ते पार पडला. सातत्याने क्लासिकल स्पर्धा भरविल्या जात असल्याबद्दल कामतेकर यांनी आयोजकांचे कौतुक केले तसेच जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. स्पर्धेत प्रमुख पंच कामगिरी विवेक सोहनी यांनी पार पाडली. मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी मार्फत आयोजित करण्यात आलेली ही सातवी क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धा असून नजीकच्या भविष्यात अश्या स्वरूपाच्या इतरही स्पर्धा भरविण्यात येतील अशी ग्वाही स्पर्धा आयोजक चैतन्य भिडे यांच्या कडून देण्यात आली.