
उक्षी गावचे माजी सरपंच अन्वर गोलंदाज यांना राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार
रत्नागिरी: नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन (रजि.) बेळगावी आणि इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी (रजि.) जि. बेळगावी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात उक्षी गावचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते,अन्वर गोलंदाज यांना ‘राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमधून निवडक व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.अन्वर गोलंदाज यांनी सामाजिक, शैक्षणिक, शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय, निःस्वार्थ आणि भरीव कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
अन्वर गोलंदाज यांनी वांद्री येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी विशेष निधी गोळा केला होता. पूर आल्यानंतर लोकांना त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी अन्वर गोलंदाज यांनी केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी याची ते विशेष प्रयत्न करत असतात. विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप,लॅपटॉप,संगणक त्यांनी आपल्या माध्यमातून केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातातील अपघात ग्रस्तांना रात्री अपरात्री धाऊन मदतकार्य करणे तसेच त्यांना प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवणे,रुग्णालयात दाखल करणे असे उल्लेखनीय समाजकार्य गोलंदाज यांनी केले आहे.
त्यांच्या नावाची शिफारस अनेक व्यक्ती आणि सरकारी अधिकाऱ्यांनी केली होती. त्यांचे कार्य आणि सेवा अतुलनीय असून, या पुरस्कारामुळे त्यांना अधिक प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल, तसेच इतरांनाही त्यांच्या कार्याचा आदर्श घेता येईल, असे गौरवोद्गार पुरस्कार वितरण सोहळ्यातील मान्यवरांनी काढले.या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री कर्नाटक सरकार आणि माजी केंद्रीय कायदामंत्री वीरप्पा मोइली, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावजूर, खासदार अमरसिंह पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांनी अन्वर अल्ली गोलंदाज यांच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितले की, हा पुरस्कार माझ्या कार्याची पोचपावती आहे आणि यापुढेही मी समाजासाठी अधिक जोमाने कार्य करत राहीन.पुरस्कार स्वीकारण्यासाठी अन्वर गोलंदाज यांच्यासमवेत विक्रांत गांधी,रवींद्र कांबळे, मीनाज झारी,रमेश गराटे,भगवान चौगुले,यशवंत पाटील, अझर गोलंदाज, हेमंत नाईक, दयानंद घाडगे इत्यादी मित्रमंडळी उपस्थित होती.