
जि.प.मुख्य कार्यकारी गेले खेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौर्याला… अन् दिशा समितीच्या सभेला गैरहजर राहिल्याने रत्नागिरीत दोन्ही खासदार संतापले
रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या दिशा कमिटीच्या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह अनेक अधिकार्यांनी दांडी मारत कमिटीची अवहेलना व अवमान केला. त्यामुळे संतापलेल्या खासदारांनी अधिकार्यांचा निषेध करीत दिशा कमिटीची बैठकच तहकूब करण्याचा निर्णय घेत, याबाबत अधिकार्यांचा रिपोर्ट राज्य व केंद्राच्या मुख्य सचिवांकडे पाठवला जाणार असल्याचे खा. सुनील तटकरे व समिती अध्यक्ष खा. विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. लोकसभेने स्थापन केलेल्या दिशा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात मागील आठ वर्षानंतर प्रथमच होणार होती. मात्र ही सभा तहकूब करण्याची वेळ आली. याबाबत जाणिवपूर्वक राजकारण केले जात असल्याचा आरोप दोन्ही खासदारांनी केला. जाणिवपूर्वक गैरहजर राहणार्या अधिकार्यांवर कारवाईचा ठराव या बैठकीत करण्यात आला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या दौर्याला गेले. संसदेने तयार केलेल्या कमिटीची ही अवहेलना असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले.जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी हे या समितीचा अजेंडा तयार करीत असतात. त्यांनी अजेंडा तयार केला परंतु स्वत:च गैरहजर राहिले. पूर्व कल्पना न देताच गैरहजर राहिल्याबद्दल खा. तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.