पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएकडे, गृहमंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय!

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. गृह मंत्रालयाने याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे. त्यामुळे एनआयए औपचारिकपणे या हल्ल्याचा तपास करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयएचं पथक हल्ला झाल्यापासून पहलगाममध्ये असून या प्रकरणाचा तपास करत आहे. आता केंद्र सरकारने अधिकृतपणे संपूर्ण तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.राष्ट्रीय तपास यंत्रणा स्थानिक पोलिसांकडून या हल्ल्याशी संबंधित आतापर्यंत मिळालेली माहिती, केस डायरी, एफआयआर आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेईल आणि पुढील तपास सुरू करेल. पहलगमामधील हल्ल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील नागरिकांच्या, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिणामी येथील सुरक्षेची जबाबदारी प्रमुख दहशतवादविरोधी संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. एनआयए लवकरच या हल्ल्याच्या सर्व पैलूंचा सखोल तपास करेल. हल्ल्याचा कट कोणी व कुठे रचला? यामध्ये सहभागी दहशतवादी संघटना, त्यांची भूमिका, स्लीपर सेलचा संभाव्य धोका याविषयीचा तपास करून लवकरच गृह मंत्रालयाला अहवाल सादर करेल.

*एनआयएने या प्रकरणाशी संबंधित प्राथमिक माहिती गोळा केली आहे. जेणेकरून त्यांना त्यांचा तपास राष्ट्रीय पातळीवर पुढे नेता येईल. सुरुवातील जम्मू-काश्मीर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. परंतु, हल्ल्याचं गांभीर्य, नागरिकांची सुरक्षितता, मोठा दहशतवादी कट व आगामी धोके लक्षात घेता गृह मंत्रालयाने या हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवला आहे.*तपास यंत्रणेसमोर मोठं आव्हान*पहलगामधील हा हल्ला भारतातील सुरक्षा यंत्रणांपुढील मोठं आव्हान आहे. संरक्षण यंत्रणा व गुप्तचर विभागाच्या डोळ्यात धूळ फेकत दहशतवाद्यांनी पहलगाममधील बैसरन येथे घुसून पर्यटकांवर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक मारले गेले. या हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्यामुळे या हल्ल्याचा तपास करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणं हे संरक्षण यंत्रणेसमोरील मोठं आव्हान आहे. तसेच तपास यंत्रणांना त्यांची कार्यक्षमता सिद्ध करावी लागेल.

पहलगाम हल्ल्यानंतर संरक्षण दल सतर्क झालं आहे. या हल्ल्यात दोन पाकिस्तानी व दोन काश्मिरी दहशतवादी सहभागी होता. तपास यंत्रणा सध्या या चौघांचा शोध घेत आहेत. तसेच पाकिस्तानी दहशतवादी भारतात कसे घुसले, त्यांना शस्त्रास्र कुठून मिळाली. पाकिस्तानातून मदत कशी मिळाली या सर्व पैलूंची माहिती गोळा केली जात आहे. एनआयए या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा कट, स्थानिक नेटवर्क आणि त्यांना मदत करणाऱ्यांची माहिती गोळा करत आहे. तसेच त्यांनी काश्मीर खोऱ्यात चौकशी देखील सुरू केली आहे. काही संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची देखील कसून चौकशी चालू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button