
राजापूर शहरात तीव्र उतारावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर खाली सापडून चालकाचा दुर्दैवी मृत्यू.
राजापूर शहरात तीव्र उतारावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर खाली सापडून चालकाचा दुर्दैवी मृत्यू होण्याचा प्रकार घडला आहेराजापूर शहरातील वरचीपेठ येथे शुक्रवारी सकाळी एका दुर्दैवी घटनेत तीव्र उतारावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालक प्रमोद पांडुरंग मांजरेकर (वय ५१) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे वरचीपेठ परिसरात शोककळा पसरली आहे. प्रमोद मांजरेकर हे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपला ट्रॅक्टर घेऊन कामासाठी निघाले होते. त्यांचे घर वरचीपेठ येथे असून घराला लागूनच तीव्र उताराचा रस्ता आहे. याच ठिकाणी अचानक प्रमोद यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात प्रमोद ट्रॅक्टरच्या पुढच्या भागाखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर मांजरेकर कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने आसपासच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तरुणांनी ट्रॅक्टर उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही.अखेरीस जेसीबीच्या मदतीने ट्रॅक्टर बाजूला करून प्रमोद यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.प्रमोद यांच्या अपघाती निधनाची बातमी शहरात पसरताच राजापूर ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती




